अन्यायकारक प्रारूप विकास योजना आराखडा रद्द करा – आकाश बाफना
आजच्या बैठकीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे
प्रशासक काळात तयार केलेला जामखेड शहर विकास आराखडा प्रशासनाने नेमका कोणाच्या फायद्यासाठी केला असा सवाल नागरिक उपस्थित करतांना दिसून येत आहेत. व्यापार्यांना, राजकीय, सामाजिक लोकांना, जनतेला विश्वासात न घेता केलेल्या शहरविकास आराखड्याला शहरातील व्यापारी मुस्लिम पंच कमिटी व नागरिकांनी विरोध करत तीव्र संताप व्यक्त केला आहे. ताबडतोब रद्द करण्यात यावा अशी मागणी युवा उद्योजक आकाश बाफना यांनी केली आहे.
जामखेड नगरपरिषद यांनी प्रसिद्ध केलेला जामखेड शहर प्रारूप विकास योजना आराखडा बाबत बऱ्याच नागरिकांनी हरकती घेतलेल्या होत्या त्या हरकतींवर म्हणणे मांडण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने नोटीस काढून त्या हरकती संदर्भात म्हणणे सादर करणे बाबत सूचित केले आहे. यानुसार युवा उद्योजक आकाश बाफना, विनायक राऊत व प्रा. मधुकर राळेभात हे जामखेड करांच्या हक्कासाठी न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे यापूर्वी ही दिसून आले आहे.
सदर आलेल्या नोटिसवर आपले म्हणणे एकत्रितपणे सादर केले तर कोणावरही अन्याय होणार नाही व प्रशासनावर या गोष्टीचा दबाव पडेल यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन युवा उद्योजक आकाश बाफना यांनी आवाज जामखेडचा न्युजशी बोलताना केले आहे.
बाफना म्हणाले की, आपण सर्वांनी एकत्र येऊन नियोजित अन्यायकारक प्रारूप विकास योजना रद्द करून सर्व जामखेड करांच्या हिताचा व जामखेड शहराच्या विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी आपल्याला काय भूमिका घ्यायची याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी नोटीस आलेल्या सर्व जामखेडकर ग्रामस्थ बंधूंची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.
सर्वांनी एकत्र आले तरच आपण प्रत्येकावर होणारा अन्याय रोखू शकतो पर्यायाने आपले जामखेड शहर देखील आपण योग्य रीतीने विकासाच्या दिशेने नेऊ शकतो. तरीही सर्व नोटीस धारकांनी आज रात्री आठ वाजता होणाऱ्या बैठकी साठी उपस्थित राहवे ही नम्र विनंती युवा उद्योजक आकाश बाफना, प्रा. मधुकर राळेभात, विनायक राऊत यांनी केली आहे.
संयोजक जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समितीच्या वतीने सदर बैठक ही श्री शनि मारुती मंदिर,जामखेड श्री छत्रपती शिवाजी महाराज पेठ येथे गुरुवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी ठिक रात्री ८.३० वाजता ठेवण्यात आलेली असून सर्वांनी वेळेवर उपस्थित राहान्याचे आवाहन त्यांनी केले आहे.