कृषीचे प्रलंबित अनुदान व अग्रीम विमा शेतकऱ्यांना लवकरच मिळणार – अमोल राळेभात
जामखेड प्रतिनिधी,
जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचा मंजुर विमा व कृषी विभागाकडील प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांना ताबडतोब मिळावे, अशी मागणी नगर-दक्षिणचे खासदार मा.श्री.सुजय दादा विखे पाटील यांना जिल्हा सहकारी बँकेचे संचालक श्री.अमोल जगन्नाथ राळेभात यांनी केली असुन याबाबत विखे यांनी शेतकर्याच्या खात्यात लवकरच रकमा जमा करण्याचे आश्वासन दिले आहे.
खरीप हंगामातील उडीद, मूग, सोयाबीन, बाजरी, तूर, कापूस या पिकांच्या बाबतीत मा.जिल्हाधिकारी साहेब यांच्या अधिसूचनेनुसार जामखेड तालुक्यातील पाचही महसूल मंडळाचा समावेश केलेला आहे.
विमा कंपनीने खर्डा व अरणगाव या दोन महसूल मंडळातील ७६१६ सभासदांना सोयाबीन या पिकासाठी 25% रक्कम रु. ४ कोटी ३२ लाख ४९ हजार ६९७ मात्र लाभार्थी सभासदांच्या बचत खाती जमा केलेली आहे. उर्वरित महसूल मंडळांना 25% रक्कम देण्याऐवजी पीक कापणी प्रयोगाच्या आधारे सर्वच मंजूर विमा रक्कम तत्काळ जमा करून खरीप हंगामातील सर्वच पिकांसाठी पीकविमा मंजूर करावा.
तसेच कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनेत महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीने निवड झालेले शेतकरी संमती मिळाल्यानंतर संबंधित घटकाची खरेदी करून देयके पोर्टल वरती अपलोड करतात. सद्यस्थितीत यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन, तुषार सिंचन इत्यादी घटकांचे अनुदान शेतकऱ्यांना विलंबाने मिळत आहे. त्यामध्ये खास करून प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना २०० शेतकरी ३० लाख रुपये, कृषि यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ६५ शेतकरी ५३ लाख रुपये अनुदान प्रलंबित आहे. कृषी विभागाकडील योजनांचा प्रलंबित निधी मिळणेबाबत शेतकऱ्यांकडून वारंवार विचारणा होत आहे.
तरी प्रलंबित निधी तत्काळ देण्यात यावा.
याबाबतचे निवेदन देताना जिल्हा सहकारी बँकेचे संचालक श्री.अमोल जगन्नाथ राळेभात व सोबत कर्जतचे शिवसेना तालुकाध्यक्ष श्री.सोमनाथ शिंदे. यावेळी नगर-दक्षिणचे लोकप्रिय खासदार मा.श्री.सुजय दादा विखे पाटील यांनी सदरील रक्कम लवकरच जमा दिली जाईल असे आश्वासन दिले.