कुसडगांव येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या काजेवाडी ते कुसडगाव दरम्यान पाणीपुरवठा पाईपलाईनचे भूमिपूजन संपन्न
जामखेड प्रतिनिधी,
कर्जत व जामखेड तालुक्यातील महिला, शेतकरी तसेच सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी आ. राम शिंदे हे सातत्याने प्रयत्न करत असताना त्यांच्या पाठपुराव्यातून मंजूर झालेल्या कुसडगांव येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या काजेवाडी ते कुसडगाव दरम्यान पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनचे भुमीपुजन म्हणजे त्यांचे शासकीय कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याकडेही लक्ष असल्याचे मत जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले यांनी व्यक्त केले.
माजीमंत्री व भाजपा नेते आमदार प्रा.राम शिंदे यांच्या विशेष पाठपुराव्यातून जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे राज्य राखीव दलाच्या १३०० अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निर्माण केलेल्या वसाहतीच्या पाणी पुरवठा योजनेचा जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पै.शरद कार्ले यांच्या हस्ते व पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, उद्योजक राजूशेठ देशपांडे, सरपंच पप्पू कात्रजकर, हभप पाठक महाराज व सोसायटी चेअरमन केशव कात्रजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नारळ फोडून व टिकाव टाकून शुभारंभ करण्यात आला. काजेवाडी तलावाच्या उदभवावरून पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी २.२३.६६,८५०/- इतकी रक्कम मंजूर करण्यात आली असून ही योजना पुर्ण झाल्यानंतर राज्य राखीव दलाच्या १३०० अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वसाहतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याने सदर कर्मचाऱ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.
या पाणी पुरवठा योजनेच्या भुमीपुजन कार्यक्रमासाठी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 19 कुसडगावचे समादेशक दिलीप खेडेकर, सहाय्यक समादेशक श्री. विश्वास, विकास पाटील, पोलीस निरीक्षक मनोज पवार, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटणे, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग बुरंगे यांच्या आदी मान्यवर उपस्थित होते.