*कर्करोगाविषयी जागरूकतेसाठी ‘कर्करोग प्रबोधन यात्रा’ प्रभावी उपक्रम – प्रा.राम शिंदे*

अहिल्यानगर दि.३-

जनमानसांमध्ये कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करणे, प्रतिबंधात्मक उपायांची माहिती आणि त्यांना त्वरित निदानास प्रेरित करण्यासाठी ‘कर्करोग प्रबोधन यात्रा’ हा उपक्रम अत्यंत प्रभावी आहे. शासनाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर हा उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी केले.

शहरातील इंडो आयरिश हॉस्पिटल येथे कॅन्सर प्रबोधन यात्रेचा शुभारंभ प्रा.शिंदे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखूवन करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते तथा जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य दिल्ली संजय कोठारी, डॉ. दिलीप जोंधळे, डॉ.वसुधा जोंधळे, राकेश जोंधळे ,डॉ. दत्तात्रय अंधूरे, कडूभाऊ काळे, राजेंद्र पवार, विनोद परदेशी, सचिन गाडे, लहू शिंदे आदी उपस्थितीत होते.

प्रा.शिंदे म्हणाले, कर्करोग हा केवळ एक आजार नसून तो एक सामाजिक आणि मानसिक आव्हान आहे. कर्करोग बळावल्यानंतर रुग्णासह संपूर्ण कुटुंबाला एका मानसिक त्रासातून जावे लागते. कर्करोगाविषयीची लक्षणे पाच वर्षापूर्वीच शरीरामध्ये दिसू लागतात. एकवेळेस कर्करोग झाला की तो बरा होऊ शकत नाही, हा गैरसमज आजही समाजामध्ये आहे. हा गैरसमज दूर करण्यासाठी प्रबोधन यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

कर्करोगावर मात करत पुन्हा एकदा नव्याने आयुष्याला सुरुवात केलेली अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन विविध आजारांवर उपचार करण्यात येत आहेत. लोकांमध्ये जनजागृती निर्माण करून आपण हा आजार वेळीच रोखू शकतो आणि समाज निरोगी ठेवू शकतो,असेही ते म्हणाले.

डॉ. जोंधळे म्हणाले, आज कर्करोगाविषयीच्या प्रबोधनाची गरज आहे. भारतामध्ये तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोग या आजाराला बळी पडल्याच्या घटना आपण पहातो आहोत. कर्करोगावर मात करण्यासाठी वेळीच तपासणी करुन उपचार घेणे गरजेचे आहे. अहिल्यानगर येथून सुरू झालेली ही कर्करोग प्रबोधन यात्रा सातारा जिल्ह्यापर्यंत जाणार असल्याचेही ते म्हणाले.

प्रास्ताविकात हर्षल आगळे यांनी कॅन्सर प्रबोधन यात्रेबाबत माहिती दिली.

कार्यक्रमास वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थितीत होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *