एसआरपीएफ केंद्र आणि खर्डा व मिरजगाव पोलिस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने

निधी उपलब्ध करुन देण्याची आमदार रोहित पवार यांची मागणी

जामखेड प्रतिनिधी ,

कुसडगाव (ता. जामखेड) येथील एसआरपीएफ केंद्रातील कर्मचारी व प्रशिक्षणार्थ्यांच्या निवासस्थानासाठी आणि खर्डा व मिरजगाव पोलिस ठाणे आणि तेथील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. तसेच या दोन्ही पोलिस ठाण्यांसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याचीही मागणी केली असून याबाबतचे पत्र उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

राज्यात अन्य जिल्ह्यात गेलेले एसआरपीएफ केंद्र आमदार रोहित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रयत्न करुन पुन्हा मतदारसंघात खेचून आणले. या केंद्राच्या पहिल्या टप्प्याचं कामही पूर्ण झालं असून पहिला टप्पा जेव्हा पूर्ण होतो तेव्हा दुसरा टप्पा हाती घ्यावा लागतो आणि त्यासाठी निधी लागणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील कामांमध्ये कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थ्यांच्या निवास्थानासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. तसेच या एसआरपीएफ केंद्रासाठी निमगाव गांगर्डा जलाशयातून पाणी आणण्यात येणार आहे,

परंतु त्यासाठी काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात पुढील पाच वर्षांसाठी रत्नापूर येथील लघुपाटबंधारे विभागाच्या तलावातून पाणी घेण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांतून परवानगी मिळाली आहे, शिवाय या कामासाठीच्या निधीलाही जलसंपदा विभागाने मंजुरी दिली आहे. यामुळं हे केंद्र पूर्ण क्षमतेने सुरु होण्यास मदत होणार आहे.

मतदारसंघात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आणि पोलिस ठाण्यावरील कामाचा ताण कमी होऊन लोकांना चांगली सेवा मिळावी यासाठी आमदार रोहित पवार यांनी खर्डा (ता. जामखेड) आणि मिरजगाव (ता. कर्जत) अशा दोन पोलिस ठाण्यांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजुरी आणली आणि सध्या या दोन्ही पोलिस ठाण्यांचे कामकाजही सुरू झाले आहे. परंतु हे दोन्ही पोलिस ठाणे सध्या भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या इमारतीत सुरु आहेत. तिथे पोलिसांना आवश्यक असलेल्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. तसेच या दोन्ही ठिकाणी पुरेशा मनुष्यबळाचीही गरज आहे.

त्यामुळे या दोन्ही ठिकाणच्या पोलिस ठाण्यासाठी इमारत आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. तसेच या पोलिस ठाण्यांना आवश्यक असलेले मनुष्यबळही उपलब्ध करुन देण्याची मागणी त्यांनी गृहमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

प्रतिक्रिया-

मतदारसंघामध्ये कायदा-सुव्यवस्था चांगली राहावी यासाठी एसआरपीएफ केंद्र व दोन पोलीस ठाणे आपण महाविकास आघाडीच्या काळात आपण मंजूर करून आणली. आता त्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून त्याचा विस्तार करण्यासाठी आपल्याला जो निधी आवश्यक आहे तसेच पोलीस ठाण्याला पोलीस राहावेत आणि अजून चांगली सेवा नागरिकांना द्यावी यासाठी माझा प्रयत्न आहे.

रोहित पवार
(आमदार, कर्जत-जामखेड)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *