*नागरिकांचा संताप, आमदारांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती*
*आ. रोहित पवार यांच्या उपस्थितीत जामखेडमध्ये आमसभा*
जामखेड, ता. १९ –
कर्जतप्रमाणेच जामखेडमध्येही आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या आमसभेत नागरिकांनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला. अधिकाऱ्यांकडून कामे होत नाहीत, कामांसाठी पैशांची मागणी केली जाते, बोगस बिले काढण्यात आली, वर्षानुवर्षे चकरा मारुनही कामे मार्गी लागत नाहीत, साहेब त्रास देतात अशा अनेक तक्रारींचा पाढा यावेळी नागरिकांनी वाचला. आमदार रोहित पवार यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत नागरिकांची कामे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.
आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी कर्जतमध्ये सलग आठ तास एका ठिकाणी बसून आमसभा घेतली आणि उपस्थित सर्व नागरिकांच्या तक्रारी जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. तसाच प्रयत्न सलग दुसऱ्या दिवशी जामखेडमध्ये आमसभा घेऊन केला. येथेही आमदार रोहित पवार यांनी दुपारी बारा ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सलग नागरिकांना वेळ देत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि जागेवरच त्यांचे प्रश्न सोडवण्याचे आदेश दिले. काही प्रश्नांबाबत अधिकाऱ्यांना भेटून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. यावेळी प्रांताधिकारी, बीडीओ, नायब तहसीलदार यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
आमसभा सुरु होण्यापूर्वी आमदार रोहित पवार यांनी अतिवृष्टीमुळे जामखेड तालुक्यात झालेल्या नुकसानीची काही गावांमध्ये जाऊन पाहणी केली. आमसभेला सुरवात होताच झालेल्या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे आणि बंधाऱ्यांशेजारील भराव वाहून गेल्याने त्याचीही दुरुस्ती करण्याबाबतच्या सूचना दिल्या. तसेच पंचनामे करताना नियमांचा बाऊ न करता कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्याच्याही सूचना दिल्या.
पंचायत समिती, कृषि विभाग, पोलिस विभाग अशा काही विभागांच्या कारभाराबाबत नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. सौताडा रस्त्याचे काम करताना गरीबांचे अतिक्रमण हटवण्यात आले मात्र काही ठरविक ठिकाणी रस्त्याचे काम रखडल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यावर येत्या आठ दिवसात उर्वरित अतिक्रमण काढून घेण्यात यावे यासाठी जिल्हा पोलिस दलाकडून विशेष पथक मागवून घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. पंचायत समितीकडून रोजगार हमी हमी योजनेमार्फत करावयाची कामे ठप्प असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या. जनावरांमध्ये लंपीचा प्रादुर्भाव वाढत असूनही लसीकरण होत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. त्यावर अधिकाऱ्यांनी खोटी माहिती देताच आमदार रोहित पवार यांनी त्यांना फैलावर घेत तातडीने लसीकरण पूर्ण करण्याचे आदेश दिले.
नागरिकांनी तक्रारी करूनही अधिकाऱ्यांकडून कामे करण्यास दिरंगाई होत असल्याबद्दल आमदार रोहित पवार यांनी आमसभेतच तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांचेही कान टोचले. कोणत्याही परिस्थितीत सामान्य नागरिकांना त्रास न देता सहानुभूतीच्या भावनेतून त्यांच्या अडचणी मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.
चौकट
नागरिकांना होणारा त्रास पाहून आमसभेमध्ये अनेकदा आमदार रोहित पवार यांना अनेकदा संताप अनावर होत असल्याचे जाणवत होते, परंतु अशाही परिस्थितीत अधिकाऱ्यांची ‘सार्वजनिक पूजा-आरती’ नको म्हणून त्यांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळली. परंतु भविष्यात पुन्हा अशाच तक्रारी कायम राहिल्या तर लोकं ही माझीही ऐकणार नाहीत आणि जे घडेल त्याला पूर्णतः अधिकारी जबाबदार असतील, असा इशारा मात्र त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. त्यामुळं भविष्यात प्रशासनाच्या काराभारात किती सुधारणा होते, हे पहावं लागेल.
![]()