बावी गावच्या सीमा पवार ह्यांची राष्ट्रीय पातळीवर चमक, नॅशनल योगासन चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदकाची कमाई !
जामखेड प्रतिनिधी,
बावी गावच्या सौ. सीमा सुधीर पवार ह्यांनी आपल्या अप्रतिम कामगिरीने योगासन क्रीडेत मोठी झेप घेतली आहे. नुकत्याच पार पडलेल्या *६ व्या नॅशनल योगासन चॅम्पियनशिप – २०२५* मध्ये सीमा यांनी दमदार खेळ करत सिनियर A(२८ ते ३५) गटामध्ये *रौप्यपदक (Silver Medal)* पटकावले. या यशामुळे संपूर्ण गाव व तसेच जिल्ह्याचा अभिमान उंचावला आहे.
सीमाने सुरुवातीला *पुणे जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा २०२५-२६* मध्ये प्रथम क्रमांक मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. त्यानंतर *छत्रपती संभाजीनगर येथे २८ ते ३१ ऑगस्ट* दरम्यान झालेल्या महाराष्ट्र राज्य योगासन चॅम्पियनशिपमध्ये राज्यातील २८ जिल्ह्यांतील नामांकित खेळाडूंमध्ये सीमा चमकली आणि *सुवर्णपदक (Gold Medal)* जिंकत राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड निश्चित केली. या स्पर्धेत केवळ सुवर्णपदक विजेत्यांनाच नॅशनलमध्ये संधी मिळाली होती.
पुढे, *छत्तीसगडच्या भिलाई-दुर्ग येथे ११ ते १४ सप्टेंबर* दरम्यान झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील ३० राज्यांतील आघाडीचे योगपटू सहभागी झाले होते. स्पर्धेच्या सेमीफायनलमधून टॉप १० खेळाडू फायनलमध्ये पोहोचले. फायनलमध्ये सीमाने *५० पैकी ४२.३३ गुण* मिळवत थेट *रौप्यपदक* पटकावले.
या भव्य स्पर्धेचे आयोजन भारत सरकारच्या युवक कल्याण आणि खेळ मंत्रालय विभागामार्फत योगसना भारत (इंडियन योगा एसोसिएशन) या संस्थेमार्फत करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून छत्तीसगडचे मुख्यमंत्री श्री विष्णू देव साई, छत्तीसगड विधानसभेचे अध्यक्ष श्री रमण सिंग, योगसना भारत चे अध्यक्ष श्री उदित सेठ, योगसना भारत चे संयुक्त सचिव श्री जयदीप आर्या, महाराष्ट्र योगा एसोसिएशन चे अध्यक्ष श्री संजय मालपाणी उपस्थित होते. सीमा यांच्या या यशामागे त्यांचे गुरु श्री चंद्रकांत पांगारे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
सीमाच्या या अभूतपूर्व कामगिरीबद्दल विविध स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत असून परिसरात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पसरले आहे.
![]()