*खर्डा येथील ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’च्या फ्लेक्सवर आमदार रोहित पवार व खासदार निलेश लंके यांचा उल्लेख नाही; स्पष्टीकरण न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा*
खर्डा (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राज्यभर मंडळ स्तरावर आयोजित करण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’च्या खर्डा मंडलातील कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका, सोशल मीडियावरील जाहिराती तसेच कार्यक्रमस्थळी लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर स्थानिक लोकप्रतिनिधी असलेले आमदार रोहित पवार तसेच अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांचा साधा नामोल्लेखही नसल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विधानसभेत चार लाख मतदारांनी निवडून दिलेल्या तसेच लोकसभेत सोळा लाख मतदारांच्या जनप्रतिनिधींचा हा अवमान सहन केला जाणार नसून याबाबत योग्य स्पष्टीकरण न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
शासनाच्या विविध विभागांतर्गत ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांचे दैनंदिन प्रश्न सोडविणे, तक्रारी तत्काळ निकाली काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख व गतिमान करण्याच्या उद्देशाने राज्यातील प्रत्येक तालुक्यात मंडळ स्तरावर अशा प्रकारच्या महाराजस्व समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरांमध्ये महसूल विभागासह इतर शासकीय विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात.
अशाच प्रकारचे शिबिर खर्डा येथील श्री क्षेत्र सिताराम गड येथे आयोजित करण्यात आले होते. शिबिर सकाळी नऊ वाजता सुरू झाले. दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर शिबिराला भेट देण्यासाठी आले असता, कार्यक्रमस्थळी लावलेल्या फ्लेक्सवर स्थानिक आमदार रोहित पवार तसेच अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांचा फोटो अथवा नाव कुठेही नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच या कार्यक्रमाची जाहिरात करणाऱ्या सोशल मीडियावरील पोस्ट आणि जाहिरातींमध्येही या दोन्ही लोकप्रतिनिधींचा उल्लेख नसल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान या फ्लेक्सवर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे फोटो वापरण्यात आले होते. तसेच शिबिराचे उद्घाटक म्हणून पुन्हा विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे नाव छापण्यात आले होते. कार्यक्रमाच्या संयोजकांमध्ये जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, निवासी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच कर्जत व जामखेडचे तहसीलदार यांची नावे नमूद करण्यात आली होती.
राजशिष्टाचारानुसार कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही शासकीय कार्यक्रमात स्थानिक आमदार तसेच संबंधित मतदारसंघाचे खासदार यांची नावे व फोटो समाविष्ट करणे अपेक्षित असताना तो प्रोटोकॉल कोणी मोडला? अधिकाऱ्यांवर कोणाचा दबाव होता का? सर्व अधिकाऱ्यांची नावे नमूद केल्यानंतर आमदार व खासदारांचे नाव टाकणे कसे राहून गेले? प्रशासनाला हा कार्यक्रम सत्ताधाऱ्यांना मिरवण्यासाठी घ्यायचा आहे की सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी? असे प्रश्नही गोलेकर यांनी उपस्थित केले.
महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील प्रत्येक महसुली गावात अशाच प्रकारच्या महाराजस्व शिबिरांचे यशस्वी आयोजन केले होते. त्यामुळे प्रशासनाने त्यांना विश्वासात घेऊन या शिबिराचे नियोजन केले असते तर कार्यक्रम अधिक लोकाभिमुख व सर्वसामान्यांच्या हिताचा ठरला असता, असेही गोलेकर यांनी नमूद केले.
या संपूर्ण प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने याबाबत तात्काळ स्पष्टीकरण द्यावे, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांनी दिला.
![]()



