नेवासा नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांवर गोळीबार; उपनगराध्यक्षांच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल

नेवासा नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांवर गोळीबार; उपनगराध्यक्षांच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल

 

नेवासा प्रतिनिधी

नेवासा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी निखिल फराटे यांच्यावर गोळीबार केल्याच्या आरोपावरून संजय लक्ष्मण सुखदान (रा. नेवासा) याच्याविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय सुखदान हे नेवासा नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षांचे पती आहेत.
मुख्याधिकारी निखिल फराटे यांनी अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करून तो तपासासाठी नेवासा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्याची माहिती नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश पाटील यांनी सांगितले. आरोपी संजय सुखदान याचा शोध घेत असल्याची माहिती त्यांनी दिली.
गोळीबाराची घटना दि. १३ एप्रिलच्या रात्री पावणेआठच्या सुमारास घडली. मात्र मुख्याधिकारी फराटे यांनी काल, शनिवारी सायंकाळी तोफखाना पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करून तो नेवासा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. आपण घाबरलो असल्याने लगेच तक्रार दिली नाही, असे मुख्याधिकारी फराटे यांनी नमूद केले आहे.मुख्याधिकारी फराटे यांनी फिर्यादीत म्हटले की, संजय सुखदान यांनी यापूर्वीही नियमबाह्य कामासाठी दबाव आणला होता, त्यास नकार दिल्यानंतर त्याने चप्पल उगारून मारहाणीचा प्रयत्न केला होता. तसेच आम्ही सांगू तसे काम केले नाही तर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिली होती.
दि. १३ एप्रिलच्या सायंकाळी नगरपंचायत कार्यालयात चर्चा सुरू असताना संजय सुखदान तेथे येऊन शिवीगाळ करत, तू बाहेर ये, आज तुला बघतोच, अशी धमकी दिली. त्यानंतर आपण कार्यालयीन कामकाज आटोपून अहिल्यानगरकडे निघालो असताना संजय सुखदान याने त्याच्या बुलेट मोटरसायकलने आपल्या चारचाकी वाहनास धडक दिली. त्यानंतर पुढे खोलेश्वर मंदिर चौकाजवळ वाहन आडवे लावून गावठी कट्ट्यातून आपल्या दिशेने गोळीबार केला. आपण खाली वाकल्याने गोळी चुकली. दुसरी गोळी झाडताना गावठी कट्ट्याचा ट्रिगर अडकल्याने आपण बचावलो.
आपण घाबरलो असल्याने तत्काळ तक्रार दाखल केली नाही, मात्र आरोपी संजय सुखदान याचे काही साथीदार पाठलाग करत असल्याचे लक्षात आल्याने फिर्याद दिली असेही नमूद केले आहे.

 

 

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles