*आवाज जामखेडचा: सराफ बांधवांचे तहसीलदार यांना निवेदन; दोषींवर कठोर कारवाईची मागणी*
जामखेड प्रतिनिधी,
जामखेड शहर व तालुक्यातील सराफ सुवर्णकार व संलग्न कारागीर बांधवांनी अहिल्यानगर येथील कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी गणेश देशमुख व कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप करत तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
या संदर्भात जामखेड पोलीस ठाण्यास निवेदन देण्यात आले असून, दोषींना सेवेतून बडतर्फ करणे, फौजदारी गुन्हे दाखल करणे आणि SIT अथवा CID चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
*निवेदनातील आरोप*
निवेदनात 16 एप्रिल 2026 रोजी कोतवाली पोलिसांनी सराफ व्यावसायिकांना कायदेशीर प्रक्रिया न पाळता ताब्यात घेऊन मारहाण, बेकायदेशीर रिकव्हरी आणि खंडणीसारखे प्रकार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे आणि राज्य शासनाच्या SOP चे उल्लंघन झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
*सराफ यांच्या प्रमुख मागण्या*
या निवेदनात संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी बडतर्फ करण्याची, त्यांच्यावर खंडणी, अपहरण, गंभीर दुखापत व पुराव्यांशी छेडछाड केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी आहे. दोषी अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची ACB मार्फत चौकशी करून जप्ती, तसेच प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी SIT किंवा CID नेमण्याची मागणीही करण्यात आली आहे.

या वेळी सराफ सुवर्णकार संरक्षण समितीचे उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख मोहन ढाळे यांच्यासह जयदीप वेदपाठक, अनिल बेंद्रे, विशाल सोनार, सुरज जाधव, श्रीकांत कुलथे, अमोल चिंतामणी, राहुल शहाणे, मनोज बोळे, अण्णा कोल्हे, भीमराव डूचे, शैलेश बोळे, विजय पेडगावकर, गोरख कुलथे, संकेत ढाळे, कांतीलाल जी कोठारी, श्रवण चिंतामणी, संजय पेडगावकर, अजित लोळगे, रोहित पेडगावकर, विकास दिंडोरे, मनोज पाटील, ज्ञानेश्वर कुलथे, आणि राजू कुलथे असे पदाधिकारी व मोठ्या संख्येने सराफ बांधव उपस्थित होते.
![]()
