जामखेड प्रतिनिधी :
जामखेड शहराचे ग्रामदैवत श्रीनागेश्वर महाराज यांच्या यात्रोत्सवाची तयारी जोरात सुरू झाली असून, यात्रेच्या निमित्ताने बीड रोडवरील एमआयडीसी मैदानावर भव्य आनंदमेळा आयोजित करण्यात आला आहे.
या आनंदमेळ्याचे नारळ फोडून भूमिपूजन उत्साहपूर्ण वातावरणात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.श्रीनागेश्वर यात्रेला जामखेड शहरासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात.
यात्रेच्या निमित्ताने नागरिकांना मनोरंजनाची पर्वणी मिळावी, यासाठी एमआयडीसी मैदानावर आनंदमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळ्यामध्ये विविध मनोरंजनाची साधने, खाद्यपदार्थांचे स्टॉल, खेळणी तसेच लहान-मोठ्यांसाठी विविध आकर्षणे उपलब्ध राहणार आहेत. त्यामुळे यंदाच्या यात्रेच्या उत्साहात आनंदमेळ्यामुळे आणखी भर पडणार आहे.
आनंदमेळ्याच्या भूमिपूजनप्रसंगी प्रा. मधुकर आबा राळेभात, नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट नाना राळेभात, सभापती शरद कार्ले, अमिंतभाऊ चिंतामणी, अजयदादा काशिद, डॉ. भगवान मुरूमकर, नगरसेवक विकी घायतडक सर, नगरसेवक हर्षद काळे, प्रविण होळकर, ऋषिकेश मोरे, नगरसेवक संतोष गव्हाळे, नगरसेवक मोहन पवार यांच्यासह सर्व नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी, आयोजक, व्यापारी, नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षितता तसेच नागरिक व भाविकांच्या सोयी-सुविधांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.श्रीनागेश्वर यात्रोत्सव शांततेत, उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पाडण्यासाठी नागरिकांनी जामखेड नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी यांनी केले आहे.

यात्रोत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या या भव्य आनंदमेळ्यामुळे जामखेडकरांसह परिसरातील नागरिकांना मनोरंजनाची मोठी पर्वणी मिळणार असून, यात्रेच्या उत्साहात चांगलीच रंगत येणार आहे.