*आ. रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन*
*कर्जत-जामखेडमधील तरुण-तरुणींना रोजगाराची संधी*
कर्जत-जामखेड, दि. १ :
कर्जत-जामखेड मतदारसंघातील तरुण-तरुणींना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आ. रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बारामती ॲग्रो लिमिटेड व कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच रयत शिक्षण संस्था, उत्तर विभाग यांच्या सहकार्याने हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघातील युवकांना रोजगाराच्या माध्यमातून सक्षम करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात विविध औद्योगिक क्षेत्रांतील नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. त्यामुळे स्थानिक तरुणांना आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी मिळणार असून, पात्र उमेदवारांच्या थेट मुलाखती घेऊन निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या रोजगार मेळाव्याचे आयोजन कर्जत येथे शुक्रवार, दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत दादा पाटील महाविद्यालय येथे, तर जामखेड येथे शनिवार, दि. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत नागेश विद्यालय व कन्या विद्यालय येथे करण्यात आले आहे.
दहावी, बारावी उत्तीर्ण, कोणत्याही ट्रेडमधील आयटीआय, विविध पदविका अभ्यासक्रम तसेच B.Sc., B.Com. आणि B.A. पदवीधारक उमेदवारांना या रोजगार मेळाव्यात सहभागी होता येणार आहे. ग्रामीण भागातील तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी आपल्या बायोडाटाच्या ३ ते ४ प्रती, सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती, पासपोर्ट आकाराचे फोटो, आधार कार्ड व ओळखपत्र सोबत आणावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कर्जत-जामखेडमधील जास्तीत जास्त युवक-युवतींनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घेऊन रोजगाराची संधी मिळवण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
![]()
