७० एकर जमिनीवर स्मारक : अहिल्यादेवींचा १०८ फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा, सीना नदीपात्रात नैसर्गिक बेट

चोंडीचा विकास आराखडा ७०० कोटींचा,आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय

७० एकर जमिनीवर स्मारक : अहिल्यादेवींचा १०८ फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा, सीना नदीपात्रात नैसर्गिक बेट

जामखेड प्रतिनिधी,

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे जन्मगाव चोंडी ता. जामखेड येथे देशभरातील पर्यटक आणि इतिहासप्रेमींना आकर्षित करेल आणित्यांचे असामान्य कार्यकर्तृत्व सर्वापर्यत पोहोचेल असा चोंडी विकास आराखडा विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकारातून तयार करण्यात आला आहे. तो तब्बल ७०० कोटीचा असून ७० एकर जमिनीवर स्मारक होणार आहे. या बहुचर्चित विकास आराखड्याला चोंडी येथे आज होत असलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मूर्तस्वरूप येणार आहे.

अहिल्यादेवींचा १०८ फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा, शिल्पसृष्टी व ३५० मीटर लांब व ४० फूट रुंद नैसर्गिक बेट उभारले जाणार आहे.अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास सर्वांना शिल्पसृष्टीतून उलगडणार आहे. चोंडी गाव वेड्या बाभळीने वेढलेले होते. १९९५साली तत्कालीन ग्रामविकास मंत्री आण्णासाहेब डांगे यांनी या ऐतिहासिक गावाचा चेहरामोहरा बदलण्यास सुरुवात केली.

शिल्पसृष्टी, अहिल्यादेवींचे शिल्प,बगीचा ज्यामध्ये लाकडी घोडे, हत्ती, सिंह तसेच ऋषिमुनी, श्रीराम, लक्ष्मण यांचे शिल्प उभारण्यात आले. समाजमंदिर,आश्रमशाळा अशी विविध कामे झाली. मात्र जयंती, पुण्यतिथीशिवाय यागावात कोणी फिरकत नसल्याचे लक्षात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे माहेरचे नववे वंशज प्रा. राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी वर्णी लागताच त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या ३००व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जन्मगाव चोंडीला पर्यटनाचा दर्जा प्राप्त व्हावा यादृष्टीने विविध विकास कामे प्रस्तावित केली.

७०० कोटीचा विकास आराखडा तयार केला. १६ एप्रिल २०२५ रोजी मुंबईत विधान भवनात सभापती शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत स्थापत्य विशारद किरण कलमदानी यांनी आराखडा सादर केला.

७० एकर जमिनीवर स्मारक.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा साधारण १०८ फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा सीना नदीपात्रातील नैसर्गिक बेटावर उभारला जाणार आहे. त्यामध्ये अहिल्यादेवींची जडणघडण दर्शविणारे आठ महत्त्वाचे टप्पे असलेले समूह शिल्प पुतळ्यालगत उभारले जाणार आहेत. चोंडी लगत सीना नदीपात्रात ३५० मीटर लांब आणि ४० मीटर रुंदीचे नैसर्गिक बेट आहे.त्यावरच हा पुतळा उभारणार आहे.

पर्यावरण स्नेही रचना आणि पारंपरिक शैली यांचा समन्वय साधून एक मॉडेल गाव उभे करण्याचा मानस आहे. चोंडीचे सुशोभीकरण, संकल्पनांची जपणूक, चोंडी येथे देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी सुव्यवस्थित रस्ते, संग्रहालय,महादेव मंदिर आणि चोंडेश्वरी मंदिर जीर्णोद्धार, निवास व्यवस्था, स्थानिक उत्पादने,खाद्यपदार्थ यांची बाजारपेठ या सोयी-सुविधांना प्राधान्य देण्यात येणार आहे.-

प्रा. राम शिंदे, सभापती, विधान परिषद

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles