आ. रोहित पवार यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे महत्त्वाची मागणी; युवांना रोजगार मिळावा यासाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा

जामखेड प्रतिनिधी

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन मतदारसंघातील एमआयडीसीच्या विषयावर महत्त्वाची चर्चा आणि विनंती केली आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात उद्योगाची चाके फिरावी आणि येथील युवांना रोजगार मिळावा या प्रमुख उद्देशाने मतदारसंघात औद्योगिक क्षेत्राची निर्मिती होण्यासाठी आमदार झाल्यापासूनच रोहित पवार हे सातत्याने पाठपुरावा व प्रयत्न करत होते. दरम्यान, पहिल्याच हिवाळी अधिवेशनामध्ये २०१९ मध्ये आमदार रोहित पवार यांनी एमआयडीसीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सर्व बाजूने विचार करून सर्वेक्षण करण्यात आले व मौजे पाटेगाव व खंडाळा येथे औद्योगिक क्षेत्र स्थापन होण्याच्या दृष्टीने औद्योगिक विकास विभागाच्या मार्फत भू-निवड समितीची स्थळ पाहणी व ड्रोन सर्वेक्षण होऊन उच्चाधिकार समितीच्या बैठकीची मान्यता देखील महाविकास आघाडी सरकारच्या काळात मिळाली.

४३ व्या उच्चाधिकार समितीची सर्वात मोठी बैठक पार पडून  बैठकीत मौजे पाटेगाव व खंडाळा येथे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास अधिनियम १९६१ तरतुदीनुसार लागू करण्यास समितीने जुलै २०२२ मध्ये मान्यताही दिली परंतु, मान्यता असताना देखील अजूनही या क्षेत्राची अधिसूचना झालेली नाही. याबाबत वेळोवेळी आमदार रोहित पवार यांनी विधिमंडळात हा मुद्दा उपस्थित केला तसेच उद्योग मंत्र्यांची भेट घेऊन अधिसूचना जाहीर करण्याबाबत पाठपुरावाही केला आहे. त्यावर मंत्री महोदयांनी निर्णय घेण्याबाबत आश्वासित केलं परंतु, अजूनही त्यावर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. नुकत्याच मुख्यमंत्री व उद्योग मंत्री यांच्या भेटीमध्ये आमदार रोहित पवार यांनी दोघांकडेही मौजे पाटेगाव व खंडाळा येथे औद्योगिक क्षेत्राची अधिसूचना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ३१ मे २०२३ रोजी जाहीर करून इतर कायदेशीर बाबी या राजश्री शाहू महाराज जयंती दिनांक २६ जून २०२३ पर्यंत पूर्ण कराव्यात अशी विनंती केली आहे. राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीपर्यंत जर याबाबत ठोस निर्णय होऊन कर्जत जामखेडमधील जनतेवर राजकिय द्वेशापोटी होणारा अन्याय दूर झाला नाही तर २६ जून २०२३ पासून सर्व नागरिक, युवा वर्गासह हजारोंच्या संख्येने या अन्यायाच्या निषेधार्थ उपोषणाला बसणार आहोत, असे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

उद्योग व्यापाराचे महत्त्व ओळखून उद्योगांना अनेक सवलती देऊन चालना देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जन्मभूमी असलेल्या कर्जत जामखेड मतदारसंघात औद्योगिक क्षेत्र मंजूर असूनही केवळ राजकीय द्वेषातुन अधिसूचना झालेली नसल्याने येथील जनतेवर अन्याय होत आहे. ही बाब आमदार रोहित पवार यांनी मंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिली व या औद्योगिक क्षेत्राची अधिसूचना ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जाहीर करून इतर कायदेशीर बाबी राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती पर्यंत पूर्ण कराव्यात जेणेकरून कर्जत जामखेडमधील नागरिक व युवांवर होणारा अन्याय हा दूर होईल. अन्यथा उपोषणाचा इशारा दिल्याने आता सरकार यावर गांभीर्याने विचार करणार की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


*प्रतिक्रिया* – (चौकट)

माझ्या मतदारसंघातील युवा वर्गासाठी व नागरिकांसाठी उपोषण करण्याची वेळ आली तर मी त्याला तयार आहे. केवळ राजकीय द्वेषातून मंजूर झालेली एमआयडीसी ही फक्त पुढे-पुढे ढकलून सामान्य लोकांवरच अन्याय होतोय हे सत्तेत असलेल्या लोकांनी लक्षात घ्यावं.

– *आमदार रोहित पवार*
(कर्जत – जामखेड विधानसभा)

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles