“एक सीसीटीव्ही कॅमेरा पोलिसांसाठी” या संकल्पनेस जामखेड मेडीकल असोसिएशनचा प्रतिसाद
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहर व पोलीस स्टेशन हद्दीत कायदा व सुव्यवस्था तसेच गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणेसाठी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यानुसार आज दि. १० जून रोजी जामखेड येथील मेडीकल असोसिएशनची बैठक घेण्यात आली. यामध्ये पोलीस निरीक्षक यांच्या संकल्पनेनुसार “एक सीसीटीव्ही कॅमेरा पोलिसांसाठी” यास प्रतिसाद देत लवकरच शहरात एक सीसीटीव्ही कॅमेरा बसवून देण्याचे आश्वासन मेडिकल असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष तात्यासाहेब बांदल यांनी दिले.
पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी ही संकल्पना राबविण्यासाठी महत्त्वाची बैठक घेऊन महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शनपर सूचना दिल्या व पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यावेळी अपेक्षेप्रमाणे सर्व मेडिकल दुकानदारांनी १ सीसीटीव्ही कॅमेरा पोलिसांसाठी बसविण्याचे आश्वासन दिले असून त्याप्रमाणे त्यांच्याकडून लवकरात लवकर पूर्तता करून घेत आहोत. सदर बैठकीस मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष तात्यासाहेब बांदल यांचेसह सुमारे २५ ते ३० मेडिकल दुकानदार उपस्थित होते.