*कर्जत तालुक्यातील अंगणवाडी सेविका, आशासेविका, मदतनीस, सीआरपी व महिला सफाई कामगार यांचा कृतज्ञता सोहळा संपन्न*
*आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व महिलांच्या कार्याची दखल घेत केला सन्मान*
कर्जत | कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था यांच्या माध्यमातून कर्जत तालुक्यामध्ये कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशासेविका, मदतनीस तसेच उमेद अभियानांतर्गत सीआरपी केडर आणि महिला सफाई कामगार यांनी केलेल्या मतदारसंघातील उल्लेखनीय कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपस्थित आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस व सीआरपी ताई आणि महिला सफाई कामगार या आपले मनोगत व्यक्त करताना भावूक होत आतापर्यंत आमदार-खासदारांना टीव्हीत बघण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नसायचा, पण आज आम्ही आमच्या घरातल्या माणसांसारखे आमदारांसोबत बोलत आहोत, असे मत व्यक्त करत आम्ही मांडलेल्या गोष्टी पूर्ण देखील होत आहेत याचा आनंद वाटतो. या सगळ्या गोष्टी कर्जत-जामखेड मतदारसंघात यापूर्वी कधीही झाल्या नव्हत्या असे ठाम मत व्यक्त केले.
या सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार रोहित पवार, कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या संचालिका सुनंदाताई पवार व सामाजिक कार्यकर्त्या सविताताई व्होरा यांची उपस्थिती होती. दरम्यान, कर्जत तालुक्यातील एकूण 650 महिलांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. या कार्यक्रमादरम्यान आमदार रोहित पवार यांनी महिलांसोबत मनमोकळा संवाद साधत त्यांचा भाऊ हा नेहमी त्यांच्यासोबत असेल असा विश्वास व्यक्त केला. तसेच त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आभार मानले आणि यापुढेही आपल्या विविध अडचणी सोडवण्यासाठी कायमच कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांना दिला.
यासोबतच कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या संचालिका सुनंदाताई पवार यांनी महिलांनी पुढे जाऊन कशा पद्धतीने कार्य करावे, आणि विविध परिस्थिती कशी हाताळावी याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमादरम्यान प्रत्येक महिलेला एक मोगऱ्याचे रोप व एक डबा भेट म्हणून देण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आशा सेविका, अंगणवाडी ताई तसेच मदतनीस व सीआरपी ताई यांच्या माध्यमातून गीत गायन देखील करण्यात आले.