मुख्यमंत्री “माझी लाडकी बहिण योजना” महिलांचे झिरो बॅलन्सने बँकेत खाते उघडली जातील– संचालक श्री. अमोल जगन्नाथ राळेभात
जामखेड प्रतिनिधी,
महाराष्ट्र शासनाने माझी “लाडकी बहिण योजना” योजना आणली असून त्या योजनेमार्फत पात्र महिलांना दरमहा रक्कम रु. १५००/- शासनाकडून दिले जाणार असून त्यासाठी बँकेत खाते असणे आवश्यक आहे. महिला राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्यासाठी गेलेनंतर तेथील खाते उघडण्याची क्लिष्ट पद्धत,खात्यावर ठेवावे लागणारे २०००/- डिपॉझिट, वेगवेगळ्या प्रक्रियेतून जावून मग मिळणारे पासबुक तसेच तेथे होणारी गर्दी पाहता
त्याठिकाणी महिलांना खाते उघडण्यास येत असलेल्या अडचणी लक्षात आल्यानंतर जिल्हा सहकारी बँकेने खास मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेसाठी महिलांना खाते उघडण्यास अडचणी येऊ नयेत यासाठी बँकेचे चेअरमन मा. श्री. शिवाजीराव कर्डिले साहेब व सर्व संचालक मंडळाने “नो फ्रील” खाते उघडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हा सहकारी बँकेचे संचालक श्री.अमोल जगन्नाथ राळेभात यांनी दिली.
सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांबद्दल असणारी आस्था, कर्मचाऱ्यांची कामकाजात असणारी तत्परता पाहता जिल्हा सहकारी बँक शाखेमध्ये आधार कार्ड झेरॉक्स व दोन पासपोर्ट साईज फोटो घेवून गेल्यानंतर महिलांचे झिरो बॅलन्सने खाते उघडून खात्यास आधार नंबर लिंक करून तत्काळ माता-भगिनीस पासबुक देण्यात येईल.
तरी जामखेड तालुक्यातील तसेच जिल्हयातील जास्तीत जास्त महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेची रक्कम आपल्या बँक खात्यावर जमा होणेसाठी आपण अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या कोणत्याही शाखेत झिरो बॅलन्सने खाते उघडून मुख्यमंत्री “माझी लाडकी बहिण योजना” या योजनेचा फॉर्म लवकरात लवकर भरावा, असे आवाहन संचालक श्री.अमोल जगन्नाथ राळेभात यांनी केले.