आ. रोहित पवार काय गुड न्यूज देणार , अजितदादा पवार गटात जाणार का? कार्यकर्त्यांसहित जनतेत संभ्रम..

जामखेड प्रतिनिधी
आमदार रोहित पवार हे दिनांक 11 डिसेंबर रोजी खर्डा येथे गाव भेट व आभार दौऱ्याच्या निमित्ताने आले असताना त्यांनी कार्यकर्त्यांना दहा ते बारा दिवसात गुड न्यूज देतो असं वक्तव्य केल्याने मोठा संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये झाला असून आ. रोहित पवार हे सत्ताधारी म्हणजे अजितदादा पवार गटाकडे जातात का? असा प्रश्न निर्माण झाला असून तर आ. रोहित पवार दुसरीच कोणती गुड न्यूज देतात याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे?

याबाबत माहिती अशी की, आमदार रोहित पवार हे विधानसभेच्या विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत 1243 अशा अल्पशा मतांनी निवडून येऊन कर्जत, जामखेडचे आमदार म्हणून त्यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली. मागील पाच वर्षात त्यांनी व त्यांच्या कुटुंबाने जनतेत मिसळून कामाच्या माध्यमातून जवळीक साधली होती. मतदार संघात कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून जनतेच्या जीवावर मागील विजयाच्या दुप्पट मतांनी निवडून येण्याची त्यांनी अटकळ बांधली होती,परंतु आमदार राम शिंदे यांनी शेवटच्या फेरीपर्यंत आघाडी घेतली होती व ते निवडून आले समजून भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडायला सुरुवात केली होती.

परंतु शेवटच्या दोन फेऱ्यात आमदार रोहित पवार यांनी आमदार शिंदे यांना मागे टाकत अवघ्या १२४३ मतांची आघाडी घेऊन ते निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केल्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष केला होता. निवडून आल्यानंतर मतदारांचा आभार दौरा आमदार पवार यांनी मतदार संघात सुरु केला होता. ते खर्डा येथील जनतेचे आभार मानत असताना त्यांनी खर्डा व मुंगेवाडी येथे बोलताना म्हणाले की, मी दहा ते बारा दिवसात गुड न्यूज देणार आहे या त्यांनी केल्याच्या वक्तव्याने कार्यकर्ते व जनतेमध्ये मोठा संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे.

निवडून आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची व आ.रोहित पवार यांची समोरा समोर भेट कराड येथे यशवंतराव चव्हाण स्मृतीस्थळावर झाल्यावर अजितदादा म्हणाले थोडक्यात वाचला पाया पड काकाच्या, माझी एक सभा झाली असती ना मग तुला कळले असते या वक्तव्याची मोठी चर्चा महाराष्ट्रात झाली होती.
या वक्तव्यामुळे आमदार राम शिंदे हे कमालीचे नाराज झाले होते,त्यांनी माझ्या पराभवाचे खापर अजितदादा यांच्यावर फोडले त्यांच्याही वक्तव्याची चर्चा महाराष्ट्राने पाहिली होती.

काल 12 डिसेंबर 2024 रोजी शरद पवार साहेबांच्या वाढदिवसा दिवशी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे संपूर्ण कुटुंब, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल,छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे आवर्जून उपस्थित राहिल्यामुळे आता तर राजकीय चर्चांना मोठे उधाण आले आहे.मग त्याच उद्देशाने आमदार रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार यांच्या गटात जाण्याची गुड न्यूज देतात का? हीच अटकळीची संभ्रमावस्था कार्यकर्ते व मतदारांमध्ये बांधली जात आहे. म्हणतात ना नाटकातले “पात्र” आणि राजकारणातले “मित्र” कधीच खरे नसतात पण ते खरे मानावे लागतात याची प्रचिती महाराष्ट्रात अनेक राजकीय घटना वरून दिसून आली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात मागील पाच वर्षात मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्या अनेक पक्ष फुटल्याचे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. सत्ता कशी बदललती हे ही पाहिले पाहिजे, नाहीतर निवडणुकीत कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांना निवडून आणण्यासाठी एकमेकांच्या विरोधात लढायचे, प्रक्षोभक भाषणे करायचे नेत्यांना आमदार करायचं व नेत्यांनी सोयीनुसार पुढील काळात पक्ष बदल करायचे, याचा सुद्धा मनापासून प्रचार केलेल्या कार्यकर्त्यांचा नेत्यांना विसर पडतो,

त्यामुळे दोन्ही विरोधातील कार्यकर्त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनातली कटूता कशी संपेल याचाही विचार करण्याची आज काळाची गरज निर्माण झाली आहे?
त्यामुळे आमदार रोहित पवार यांच्या वक्तव्याच्या चर्चेने सत्तेच्या माध्यमातून विकासाकडे जाण्याचा त्यांचा कल कर्जत, जामखेडकरांना अनुभवास मिळतो का हा प्रश्न येणारा काळच ठरवणार आहे, हे मात्र नक्की ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *