जामखेड तालुका डॉक्टर्स असोसिएशन जामखेड यांच्या वतीने लोकप्रतिनिधींना निवेदन
बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन कायद्यातील जाचक अटीपासून मुक्त करा ; शासन दरबारी आवाज उठवावा
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुका डॉक्टर्स असोसिएशन जामखेड यांच्या वतीने आमदार रोहित पवार, विधान परिषद महाराष्ट्र राज्य सभापती नामदार प्रा राम शिंदे, विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे, आष्टी, पाटोदा शिरूर,मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी अध्यक्ष डॉ प्रशांत गायकवाड सचिव डॉ.सादेख पठाण, डॉ भरत देवकर,डॉ अविनाश पवार, डॉ चंन्द्रकिरण भोसले, डॉ. विकी दळवी, डॉ. अक्षय अडाले आदी उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की,
बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन करण्यासाठी सरकारने जे नियम बनवले आहेत त्यामध्ये खूप किचकट प्रक्रिया केलेली आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी छोटे व मध्यम रूग्णालयाचे या खर्चामुळे कंबरडे मोडत आहे. त्यांना रूग्णसेवेचा व्यवसाय करावा का बंद करावा? असा प्रश्न पडलेला आहे. त्यामध्ये सरकारने पुन्हा हॉस्पिटल पडताळणी सुरू करून अजून मोठी डोकेदुखी डॉक्टरांसाठी वाढवलेली आहे. पडताळणीच्या नावाखाली डॉक्टरांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे
हॉस्पिटलला पाणी पुरवठा, स्टाफचे पगार, साफसफाई खर्च, इलेक्ट्रीसिटी बील इत्यादी खर्च करायचा असतो.
आता छोट्या हॉस्पिटलवाल्यांनी इतका खर्च करून ग्रामीण भागामध्ये कसे काम करायचे ? आपल्या इकडची फी ही गरीब, ऊसतोड, मजुर लोक व दुष्काळी भाग असल्यामुळे खुप कमी असते. मग एवढा हॉस्पिटलचा खर्च कसा सहन करायचा ? तसेच वरील या जाचक अटी पासून सुटका करून सुधारीत तरतुद करावी व बॉम्बे नर्सिंग होम नुतनीकरण कालावधी हा दर ३ वर्षाच्या ऐवजी कमीत- कमी ५ वर्षाचा करावा, यासाठी आपण शासन दरबारी आवाज उठवावा व महाराष्ट्रातील सर्व डॉक्टरांना न्याय मिळवून द्यावा ही नम्र विनंती.
आमदार रोहित पवारांचा आरोग्यमंत्र्यांना तात्काळ दूरध्वनीवरून संपर्क ; दिले डॉक्टरांना आश्वासन.
जामखेड तालुका डॉक्टर्स असोसिएशन यांनी आमदार रोहित पवार यांना निवेदन दिले. यावेळी आमदार पवारांनी तात्काळ निवेदनाची दखल घेत स्वतः च्या दूरध्वनीवरून आरोग्य मंत्री प्रकाशराव आबिटकर यांना संपर्क करून याबाबत माहिती दिली असता, आरोग्यमंत्र्यांनी येत्या अधिवेशनात या विषयी नविन बिल व एक खिडकी योजना अंमलात आणणार असल्याचे आश्वासन आमदार रोहित पवारांना दिले.