*भुतवडा येथे श्री तुळसापुरी महाराज संजीवन समाधी सोहळा संपन्न*
*जामखेड (प्रतिनिधी ) -*
जामखेड- तालुक्यातील भुतवडा गावचे ग्रामदैवत श्री तुळसापुरी महाराज यांचा संजीवन समाधी उत्सव दरवर्षीप्रमाणेच आषाढी द्वादशीच्या दिवशी ग्रामस्थांकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
अनेक वर्षांपूर्वी नाथपंथीय श्री तुळसापुरी महाराज यांनी भुतवडा येथे जीवंत समाधी घेतलेली आहे. दरवर्षी आषाढी द्वादशीच्या दिवशी त्यांचा संजीवन समाधी उत्सव आयोजित करण्यात येतो. या उत्सवाच्या निमित्ताने गावातील सर्व धर्मीय लोकं एकत्र येतात. नोकरी, काम धंद्याच्या निमित्ताने बाहेरगावी असलेले ग्रामस्थ या उत्सवाच्या निमित्ताने आवर्जून येथे उपस्थित असतात. तसेच पंचक्रोशीतील भाविक या उत्सवास हजर असतात. नाथपंथीय श्री तुळसापुरी महाराजांवर येथील लोकांची प्रचंड श्रध्दा असल्यामुळे सदरचा उत्सव ग्रामस्थांच्या वतीने अत्यंत भक्तीभावाने साजरा केला जातो.
सकाळी श्री तुळसापुरी महाराजांचे संजीवन समाधीचा विधीवत अभिषेक केला जातो. त्यानंतर हरिभजन केले जाते. त्यानंतर श्री एकनाथी भारुडाचा कार्यक्रम असतो. यावर्षी भारुड सम्राट टीव्ही कलाकार गोविंद गायकवाड यांच्या भारुडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या भारुडाच्या कार्यक्रमातुन उपस्थितांचे मनोरंजन व सामाजिक विषयांवर गोविंद गायकवाड यांनी प्रबोधन केले. त्यानंतर श्री तुळसापुरी महाराजांच्या पादुकांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक ग्रामप्रदक्षणा करुन श्री तुळसापुरी महाराजांच्या समाधी मंदिरात पोहोचल्यानंतर आरती केली जाते व त्यानंतर मंदिर परिसरात महाप्रसादाचा कार्यक्रम होतो.
या कार्यक्रमासाठी दरवर्षीप्रमाणेच प्रा. मधुकर राळेभात, कैलास माने सर, माजी पोलीस निरीक्षक सोमनाथ लोंढे, येथील रहीवाशी असलेले व सध्या अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणुन नेमणुकीस असलेले सत्यवान डोके, अहिल्यानगर येथील प्रतिथयश बांधकाम व्यावसायिक शिवाजी डोके, ॲड. हर्षल डोके आवर्जून उपस्थित होते. भुतवडा व पंचक्रोशीतील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. भुतवडा गावातील युवकांनी सदर संजीवन समाधी उत्सवाचे खुप छान नियोजन केले होते.
*चौकट*
*चोवीस वर्षांपासून न्यायाधीश डोके यांची उपस्थिती*
भुतवडा गावचे भूमिपुत्र जिल्हा न्यायाधीश श्री सत्यवान डोके दरवर्षी न चुकता या संजीवन समाधी उत्सवास आवर्जून उपस्थित असतात. अगोदर शिक्षण घेत असताना तसेच नंतर वकील असताना व न्यायाधीश पदावर गेल्यानंतर गेल्या चोवीस वर्षांपासून अखंडितपणे ते या उत्सवास हजर असतात.