प्रभू नवनाथ गवळी यांनी जामखेड तहसील समोर सलग सहा दिवस उपोषण नंतर प्रशासनाला जाग, सहाव्या दिवशी मागण्या मान्य
जामखेड (प्रतिनिधी):
जामखेड तहसील कार्यालयासमोर प्रभू नवनाथ गवळी यांनी घोडेगाव येथील विकासकामे, बडेकर दलित वस्तीवरील निधी खर्च, शाळांमधील शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येविरोधात आणि घोडेगाव ग्रामसेवक व सरपंच यांच्या मनमानी कारभाराविरोधात तब्बल सलग सहा दिवस उपोषण केले. राजमाता विद्यालयात शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याची बाब त्यांनी उपोषणाच्या माध्यमातून पुढे आणली.
ही बातमी स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली. अखेर सहाव्या दिवशी माननीय तहसीलदार श्री. मच्छिंद्र पाडळे व गटशिक्षणाधिकारी श्री. शेवाळे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून गवळी यांच्या मागण्यांचा विचार करण्याचे आश्वासन दिले. तसेच अधिकृत पत्र देऊन मागण्यांच्या पूर्ततेसंदर्भात सकारात्मक भूमिका मांडल्यानंतर गवळी यांनी लिंबू सरबत प्राशन करून उपोषण मागे घेतले.
या वेळी सामाजिक कार्यकर्ते ताहेर अल्ली सय्यद, युवा नेतृत्व व भावी सरपंच माऊली भोंडवे, शिवाजी मुळे तसेच पोलीस कर्मचारी नासिर खान आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रभू गवळी यांनी उपोषणानंतर सांगितले की, “गटशिक्षणाधिकारी यांच्या कारभाराविरुद्ध जिल्हा परिषदेचे सीईओ यांच्याकडे तक्रार दाखल केली जाईल. मात्र, घोडेगावच्या विकासासाठी मी सदैव समाजसेवा करत राहीन.”
अखेर सहाव्या दिवशी ज्वलंत प्रश्नांना न्याय मिळाल्याने ग्रामस्थांत समाधान व्यक्त केले जात आहे.