पांडवस्ती शाळेत राठोड सर व मुड्डे मॅडम यांना भावनिक निरोप समारंभ

पांडवस्ती शाळेत राठोड सर व गुंजेगावकर मॅडम यांना भावनिक निरोप समारंभ

पांडवस्ती (ता. जामखेड) – जिल्हा परिषद शाळा पांडवस्ती येथे अकरा वर्षे सेवा बजावून दिलेल्या लाडक्या शिक्षक राठोड सर व गुंजेगावकर मॅडम यांचा बदलीनिमित्त भावनिक निरोप समारंभ गावकऱ्यांच्या वतीने मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास शेकडो गावकरी, विद्यार्थी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मधुकर आबा यांनी भूषविले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब डोके यांनी प्रस्ताविक भाषणात राठोड सर यांच्या परिश्रमाचे विशेष कौतुक करताना सांगितले की, पांडवस्ती ही मुख्य गावापासून दूर असूनही शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिलेला अमूल्य पाठबळ अतुलनीय आहे.
आप्पासाहेब डोके यांनी दूध व्यवसाय करत असतानाही समाजकार्याच्या क्षेत्रातही खंबीर पावलांनी पुढे येऊन ग्रामस्थांच्या कल्याणासाठी कार्य केले आहे. त्यांनी गावातील शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधा सुधारणेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या या समाजसेवेचा आदर या कार्यक्रमात विशेषपणे केला गेला.
तसेच डोके वस्तीतील विद्यार्थ्यांना पावसाळ्यात येण्याजाण्याच्या अडचणी दूर करण्यासाठी शासनाने लवकरात लवकर पूल बांधावा, अशी मागणी त्यांनी केली.

राठोड सर यांनी मनोगत व्यक्त करताना गावकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे आणि शाळा व्यवस्थापन समितीचे आभार मानले. त्यांनी गावकऱ्यांकडून मिळालेले प्रेम आणि सहकार्य कधीही विसरू न शकण्याचे सांगितले. त्याचप्रमाणे, शासनाकडून शाळेसाठी आवश्यक सुविधा मिळण्यास उशीर झाल्याची खंतही त्यांनी मांडली. गुंजेगावकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचे कौतुक करून पालकांचे मनःपूर्वक आभार मानले.

मधुकर आबा यांनी आपल्या भाषणात शिक्षकांचा बदली हा प्रशासनाचा भाग असून, त्यांनी त्यांच्या कार्यकाळात ऑनलाइन पद्धतीने बदली प्रक्रियेसाठी पाठपुरावा केला असल्याचे सांगितले. तसेच, पुढील काळात डोके वस्तीतील विद्यार्थ्यांच्या समस्यांसाठी पूल बांधणीसाठी सक्रीयपणे प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमात उपाध्यक्ष अशोक डोके, ऍडव्होकेट हर्षल डोके, युवा कार्यकर्ते श्रीराम डोके, गणेश डोके, माजी अध्यक्ष सिताराम डोके, गौतम डोंगरे, विठ्ठल डोके, वाल्मीक डोके, संजय डोके, श्रीराम डोंगरे, तुकाराम डोंगरे, नितीन दहिवाले, पांडुरंग आजबे, राजेंद्र डोके, दैवशाला डोंगरे, शिल्पा डोंगरे, आशाताई दहिवाले, अनिता माळी, शिलाबाई डोंगरे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. नवीन आलेल्या रेणुके सर व राठोड मॅडम यांचे गावकऱ्यांनी सन्मानपूर्वक स्वागत केले.

अंतिम आभार प्रदर्शन ऍडव्होकेट हर्षल डोके यांनी केले.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page