*भुतवडा–लेहनेवाडी पूल गेला वाहून ,कॅनल फुटून पिकांचे मोठे नुकसान*
नुकसानामुळे शेतकरी हवालदिल ,पंचनामा न झाल्याने शेतकरी संतप्त…
जामखेड प्रतिनिधी –
जामखेड नगर परिषद हद्दीत असलेले भुतवडा–लेहनेवाडी जोडणारा पूल मुसळधार पावसामुळे वाहून गेला असून या परिसरातील नागरिकांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. पूल वाहून गेल्याने नागरिकांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागत आहे. विद्यार्थ्यांच्या शाळा-काॅलेजला जाण्या-येण्यास मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.
दरम्यान, कॅनलमधील पाणी शेती करण्यासाठी जागोजागी अडवले गेल्यामुळे कॅनल फुटला आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोयाबीन, तूर, कांदा, मका यासारखी पिके पाण्याखाली गेली असून काही ठिकाणी बांध फुटल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
परिसरातील शेतकरी हवालदिल झाले असून त्यांनी तात्काळ पंचनामे करून योग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. मात्र, आज दुसऱ्या दिवशी पाऊस पडूनही प्रशासनाने अद्याप पंचनामा केलेला नाही. महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती व आमदार असूनही आमच्या प्रश्नाकडे कोण लक्ष देणार?” असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

![]()