आमदार रोहित पवारांच्या पाठपुराव्याला मोठे यश;* *मोहरी धरणाच्या दुरुस्तीसाठी ‘धरण सुरक्षा समिती’ सोमवारी मोहरी मध्ये

*​आमदार रोहित पवारांच्या पाठपुराव्याला मोठे यश;* *मोहरी धरणाच्या दुरुस्तीसाठी ‘धरण सुरक्षा समिती’ सोमवारी मोहरी मध्ये!*

*​खर्डा परिसरातील १० गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार; पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचे प्रशासनाचे आश्वासन*

​जामखेड:

जामखेड तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या मोहरी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या दुरुस्तीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर प्रशासनाला जाग आली असून, येत्या सोमवार, दि. १३ एप्रिल रोजी ‘धरण सुरक्षा आढावा समिती’ मोहरी धरणाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.

*​पुढारी ते अधिकारी : असा झाला निर्णय*
​मोहरी धरणाच्या भिंतीला पडलेले भगदाड आणि सांडव्याची झालेली दुरवस्था याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विजयसिंह गोलेकर यांनी आमदार रोहित पवार यांना निवेदन दिले होते. पवार यांनी तातडीने कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत धुमाळ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून पत्राद्वारे तातडीच्या कार्यवाहीची मागणी केली. यानंतर जलसंपदा विभागाच्या कृष्णा खोरे प्रकल्पाचे मुख्य अभियंता संजीव चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

*​काय करणार ही समिती?*
​सोमवारी येणारी ही उच्चस्तरीय तांत्रिक समिती धरणातील गळती, माती भराव, सांडव्याची दुरवस्था आणि कालव्यांची पाहणी करेल. धरणाची सुरक्षा मानके ठरवणे, आपत्कालीन योजना आखणे आणि धरणाखालील गावांचे संरक्षण करणे ही या समितीची मुख्य जबाबदारी आहे. या समितीच्या अहवालानंतर तातडीने मजबुतीकरणाच्या कामाला सुरुवात होणार आहे.

*​श्रेयवादाच्या लढाईत शेतकऱ्यांचे नुकसान?*
​गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे भगदाड पडले असता आमदार रोहित पवार यांनी स्वखर्चाने आवश्यक मशिनरी, जेसीबी लावून काम सुरू केले होते. मात्र, सत्ताधाऱ्यांनी तांत्रिक कारणे पुढे करत आणि श्रेयवादापोटी हे काम थांबवल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. “स्वतः काही करायचे नाही आणि दुसरा करत असेल तर खोडा घालायचा, या वृत्तीमुळे पाणी वाया गेले आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले,” अशी टीका विजयसिंह गोलेकर यांनी केली आहे.

*​का महत्त्वाचे आहे मोहरी धरण?*
-​१० गावांना आधार: खर्डा या मोठ्या गावासह परिसरातील १० गावांची तहान या धरणावर अवलंबून आहे.
-​दुष्काळातील ‘तारणहार’: संपूर्ण तालुक्याला टँकरमुक्त करण्यासाठी मोहरी तलावाचा पाणीसाठा अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
-​शेतीला संजीवनी: तेलंगशी, जायभायवाडी, मोहरी, खर्डा, गवळवाडी, पांढरेवाडी परिसरातील शेती या प्रकल्पावर अवलंबून आहे.

​मोहरी धरणाची सुरक्षा हा हजारो ग्रामस्थांच्या जीवनाचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे. प्रशासनाने आता कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्ष कामाला वेग द्यावा. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण न झाल्यास ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागेल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांनी दिली आहे.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles