माहिजळगाव-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; जामखेडचे अँड. विराज जायभाय व सोनू डुचे यांचा दुर्दैवी मृत्यू…
श्रद्धांजलीपर जामखेड तालुका वकील संघाचा दोन दिवस न्यायालयीन कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय
जामखेड प्रतिनिधी –
माहिजळगाव-अहिल्यानगर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात जामखेड येथील अँड. विराज भगवान जायभाय (वय अंदाजे २५) व सोनू डुचे (वय अंदाजे २४) या दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे जामखेड परिसरात शोककळा पसरली आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड येथील ज्येष्ठ विधिज्ञ अँड. भगवान जायभाय यांचे सुपुत्र अँड. विराज जायभाय हे पुणे येथील शिवाजीनगर न्यायालयात वकिली व्यवसाय करत होते. मोठ्या भावाच्या विवाहासाठी ते जामखेड येथे आले होते.
विवाह सोहळा आटोपल्यानंतर दि. ११ रोजी रात्री विराज जायभाय, सोनू डुचे व पुणे येथील एक मित्र असे तिघेजण पुण्याकडे निघाले होते.ते (एमएच १७ एझेड ३२४२) क्रमांकाच्या आय-२० कारमधून प्रवास करत असताना माहिजळगावजवळील आंबिलवाडी परिसरातील वळणावर चालकाचा अंदाज चुकल्याने भरधाव कार रस्ता सोडून शेतात घुसली. त्यानंतर वाहनाने अनेक पलट्या घेत उलटून भीषण अपघात झाला.अपघात इतका गंभीर होता की अँड. विराज जायभाय व सोनू डुचे यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेला पुणे येथील मित्र गंभीर जखमी झाला आहे.
अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. त्यांनी तातडीने गाडीत अडकलेल्या तरुणांना बाहेर काढून जामखेड येथे संपर्क साधत घटनेची माहिती दिली.या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून जामखेड शहरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहेत.
दरम्यान, अँड. विराज जायभाय यांच्या निधनाबद्दल जामखेड तालुका वकील संघाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच दुःखात सहभागी होत दोन दिवस न्यायालयीन कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वकील संघाचे अँड. अमीर खान यांनी दिली.
![]()
