*जामखेड शहरातील विविध विकासकामांची आ. रोहित पवारांकडून पाहणी

*जामखेड शहरातील विविध विकासकामांची आ. रोहित पवारांकडून पाहणी*

*बसस्थानक, जिल्हा उपरुग्णालय, व्यापारी संकुल, राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा घेतला आढावा*

जामखेड ता.१२-
कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी आज जामखेडमध्ये सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाचे नवे कार्यालय, अत्याधुनिक एसटी स्थानक, व्यापारी संकुल, महसूल कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, जिल्हा उपरुग्णालय, जलशुद्धीकरण केंद्र तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा आढावा घेत त्यांनी विकासकामे दर्जेदार, गतिमान आणि लोकाभिमुख पद्धतीने पूर्ण करण्यावर भर देण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणीही त्यांनी जाणून घेतल्या.

जामखेडमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्वतंत्र व प्रशस्त कार्यालय नसल्याने अनेक प्रशासकीय अडचणी निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर उभारण्यात येत असलेल्या नव्या विभागीय कार्यालयाच्या कामाची आ. रोहित पवार यांनी पाहणी केली. कामाची गुणवत्ता कायम राखत ते वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर जामखेडमधील नव्या सुसज्ज एसटी स्थानक व शॉपिंग सेंटरच्या कामाचीही त्यांनी पाहणी केली. ग्रामीण भागातील सर्वसामान्यांसाठी एसटी ही आजही सर्वात महत्त्वाची आणि परवडणारी वाहतूक सेवा असल्याचे सांगत प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी प्रशासन आणि ठेकेदारांना सूचना केल्या. यावेळी त्यांनी प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या समस्या आणि अपेक्षाही जाणून घेतल्या.

युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने सुमारे ११.५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या १५० गाळ्यांच्या व्यापारी संकुलाच्या कामाचीही त्यांनी पाहणी केली. हे काम दर्जेदार आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण व्हावे, यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा करत त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या. तसेच महसूल कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात येत असलेल्या निवासस्थानांच्या कामाचाही त्यांनी आढावा घेतला. कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा मिळाल्यास नागरिकांनाही अधिक परिणामकारक सेवा देता येते, या भूमिकेतून ही निवासस्थाने उभारण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. निवासस्थाने पूर्ण झाल्यानंतर कर्मचाऱ्यांची राहण्याची अडचण दूर होऊन त्यांना रोज दूरवरून प्रवास करण्याची गरज भासणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी जिल्हा उपरुग्णालयाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करत त्यांनी आरोग्य सुविधांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. रुग्णांना दर्जेदार आणि तत्पर आरोग्यसेवा मिळावी, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

तसेच जामखेड शहराला शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने लेहणेवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करून तेथील अडचणींचाही त्यांनी आढावा घेतला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर आणि उद्योजक बापूसाहेब कार्ले यांच्या पुढाकारातून आयोजित रोजगार मेळाव्यालाही आ. रोहित पवार यांनी भेट दिली. या मेळाव्यात दहावीपासून पदवीधर युवकांना चाकण येथील नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. निवड झालेल्या युवकांचे अभिनंदन करत त्यांनी आयोजक आणि कंपनी प्रतिनिधींचा सन्मान केला. राष्ट्रीय महामार्गाच्या कामासंदर्भात बोलताना आ. रोहित पवार यांनी विरोधकांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. विकासकामांमध्ये राजकारण न करता जनहिताला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दौऱ्यादरम्यान आ. रोहित पवार यांनी नागरिकांच्या भेटीगाठी घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते राजेंद्र कोठारी, अमोल राळेभात, शहाजी राळेभात, रमेश आजबे, वैजिनाथ पोले, सागर कोल्हे, लक्ष्मण ढेपे, नगरसेवक राजेंद्र गोरे, वसीम सय्यद, प्रशांत राळेभात, कुंडल राळेभात, संदीप गायकवाड, हरीभाऊ आजबे, दादा उगले, बजरंग डुचे यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles