संचालक सचिन घुमरे यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात; विधानपरिषद सभापती राम शिंदे यांची प्रमुख उपस्थिती
शेतकऱ्यांची बँकेच्या माध्यमातून होणारी अडवणूक आता खपवून घेतली जाणार नाही – विधान परिषद सभापती राम शिंदे
जामखेड : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवनिर्वाचित संचालकपदी निवड झालेल्या सचिन घुमरे यांचा पदग्रहण सोहळा व सत्कार समारंभ जामखेड येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला विधान परिषद सभापती राम शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना राम शिंदे म्हणाले की, मागील काळात जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची अडवणूक झाल्याच्या तक्रारी होत्या. मात्र, आता शेतकऱ्यांना त्रास होऊ दिला जाणार नाही. ज्या बँकेने त्यांच्या सोसायटीचे खातेही उघडले नाही, त्याच सोसायटीशी संबंधित व्यक्ती आज बँकेचा संचालक म्हणून निवडून आली आहे, ही महत्त्वाची बाब आहे.
येत्या काळात जामखेड तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी आपण मुख्यमंत्री यांच्याकडे आग्रह धरला असल्याचेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मधुकर आबा राळेभात होते. यावेळी तालुक्यातील विविध सोसायट्यांचे ठरावधारक, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार तालुकाध्यक्ष बापूराव ढवळे यांनी मानले. सचिन घुमरे यांच्या निवडीबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
![]()
