*कर्जत-जामखेडमधील १२ गावांत प्रवासी निवारे उभारण्यास मंजुरी; भरीव निधीची तरतूद!*
*आ. रोहित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश*
कर्जत-जामखेड, ता. २० :
कर्जत-जामखेड मतदारसंघातील ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश आले असून राज्य परिवहन महामंडळांतर्गत मतदारसंघातील १२ गावांमध्ये प्रवासी निवारे उभारण्याच्या कामांना प्रशासकीय व वित्तीय मान्यता मिळाली आहे. जिल्ह्यात एकूण ७५ ठिकाणी प्रवासी निवारे उभारण्यात येणार असून, त्यामध्ये सर्वाधिक निवारे कर्जत-जामखेड मतदारसंघात उभारले जाणार आहेत. या कामांसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.
मतदारसंघातील ग्रामीण भागात एसटीने प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य प्रवाशांना बसची प्रतीक्षा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. बसथांब्यांवर निवाऱ्याची व्यवस्था नसल्याने प्रवाशांना कडक ऊन, वारा आणि पावसात उभे राहावे लागत होते. विशेषतः विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांची यामुळे मोठी गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेऊन आ. रोहित पवार यांनी मतदारसंघातील विविध गावांमध्ये प्रवासी निवारे उभारण्यासाठी शासनाकडे मागणी केली होती. यासाठी आ. रोहित पवार यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली होती. तसेच विधिमंडळाच्या अधिवेशनातही हा प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले होते. या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर या कामांना प्रशासकीय व वित्तीय मान्यता मिळाली आहे.
यामध्ये कर्जत तालुक्यातील खेड, माही जळगाव, मांदळी, कोंभळी, रुईगव्हाण आणि कुळधरण या सहा गावांचा, तर जामखेड तालुक्यातील साकत, राजुरी, चोंडी, हळगाव, जवळके आणि जवळा या सहा गावांचा समावेश आहे. अशा एकूण १२ गावांमध्ये प्रवासी निवारे उभारण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील ७५ ठिकाणांपैकी सर्वाधिक प्रवासी निवारे कर्जत-जामखेड मतदारसंघात उभारले जाणार असल्याने मतदारसंघाला याचा मोठा फायदा होणार आहे. या प्रवासी निवाऱ्यांमुळे एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षण मिळणार आहे. विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य प्रवाशांची अनेक दिवसांपासूनची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी आ. रोहित पवार यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे विशेष आभार मानले आहेत. मतदारसंघातील नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळाल्याने नागरिकांमधूनही समाधान व्यक्त होत आहे.
![]()
