Home जामखेड वार्ता दहिगाव-उजनी पाणी योजनेच्या कामाला गती देणार; जलशुद्धीकरण केंद्राच्या जागेची नगराध्यक्षांकडून पाहणी!

दहिगाव-उजनी पाणी योजनेच्या कामाला गती देणार; जलशुद्धीकरण केंद्राच्या जागेची नगराध्यक्षांकडून पाहणी!

0
3

दहिगाव-उजनी पाणी योजनेच्या कामाला गती देणार; जलशुद्धीकरण केंद्राच्या जागेची नगराध्यक्षांकडून पाहणी!

जलशुद्धीकरण केंद्राच्या जागेचा प्रश्न मार्गी; काम तातडीने सुरू करण्याच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना सूचना

जामखेड प्रतिनिधी :

जामखेड शहर व उपनगरातील नागरिकांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या दहिगाव-उजनी ते जामखेड या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती देण्याच्या दृष्टीने जामखेड नगर परिषदेच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. प्रांजलताई चिंतामणी यांनी पुढाकार घेतला आहे. या योजनेतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राच्या (WTP) जागेची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून काम लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (MJP) अभियंत्यांना दिल्या.

यावेळी नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून जलशुद्धीकरण केंद्राच्या जागेची तसेच प्रस्तावित कामाच्या सद्यस्थितीची माहिती घेतली. योजनेच्या अंमलबजावणीत कोणत्याही प्रकारचा विलंब होऊ नये, यासाठी आवश्यक त्या बाबी तातडीने पूर्ण करून पुढील काम अधिक गतीने करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

याप्रसंगी पाणीपुरवठा सभापती श्रीराम डोके, नगरसेवक हर्षद काळे, प्रवीण चोरडिया, नगरसेविका सीमाताई कुलकर्णी, नंदाताई होळकर, सुमनताई शेळके तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंते उपस्थित होते.

दुष्काळी परिस्थितीतही सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी प्रयत्नशील!
यावेळी बोलताना नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी म्हणाल्या की, सध्या जामखेड तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीतही जामखेड शहरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी नगर परिषद प्रशासनाच्या माध्यमातून सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत.

सभापती प्रा. राम शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू असलेली दहिगाव-उजनी पाणीपुरवठा योजना जामखेड शहरासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ही योजना लवकरात लवकर पूर्ण व्हावी, यासाठी नगर परिषद प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार आहे. जलशुद्धीकरण केंद्राच्या जागेचा प्रश्न आता सुटला असून, या ठिकाणचे काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. योजनेच्या कामाला गती देऊन ती लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दहिगाव-उजनी पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर जामखेड शहर व उपनगरातील नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे या योजनेच्या पुढील कामाकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Loading

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page