प्राणप्रतिष्ठेमुळे श्रद्धा, संस्कार आणि समाजातील एकोपा अधिक दृढ होईल : दिलीप गुगळे
ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिरात श्री गणेश-विष्णू मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना
जामखेड प्रतिनिधी :
६०० वर्षांची परंपरा लाभलेल्या ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिरात श्री गणेश व भगवान विष्णू मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना हा जामखेडकरांसाठी आनंदाचा क्षण आहे. तामिळनाडूतून आणलेल्या काळ्या पाषाणातील मूर्ती मंदिराच्या धार्मिक वैभवात भर घालणाऱ्या आहेत.हा संकल्प कौतुकास्पद असून या उपक्रमामुळे श्रद्धा, संस्कार आणि समाजातील एकोपा अधिक दृढ होईल, असे मत उद्योगपती दिलीप गुगळे यांनी व्यक्त केले.
जामखेड शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री नागेश्वर मंदिर परिसरात श्री गणेश व भगवान विष्णू यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना धार्मिक विधी व भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.
या सोहळ्यामुळे मंदिर परिसरात भक्तांचा उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.एच यु गुगळे उद्योग समूहाचे उद्योगपती रमेश,दिलीप व संजय हरकचंद गुगळे यांच्या मातोश्री श्रीमती सदाबाई हरकचंद गुगळे या अनेक वर्षांपासून श्री नागेश्वर मंदिरात सेवाभावाने कार्यरत असून, मंदिरातील धार्मिक उपक्रमांमध्ये त्यांचे योगदान उल्लेखनीय मानले जाते.

शहरातील प्रसिद्ध आडत व्यापारी स्वर्गीय सुरेश दलिचंद बोथरा यांच्या संकल्पनेतून हा धार्मिक उपक्रम राबविण्यात आला.
त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे सुपुत्र बाळूशेठ उर्फ विवेक सुरेश बोथरा यांच्या हस्ते वैदिक मंत्रोच्चारात व विधिवत पूजन करून श्री गणेश व भगवान विष्णू यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
यावेळी उद्योगपती तथा जैन श्रावक संघाचे अध्यक्ष दिलीप गुगळे, सौ. सुनिताताई गुगळे, मुकुल गुगळे, श्री नागेश्वर मंदिर समितीचे विश्वस्त बाबासाहेब खराडे, मिलिंद ब्रम्हे, निलेश देशमुख यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक विधी, पूजन व आरतीचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
![]()
