**सरसकट कर्जमाफीवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा; अन्यथा २९ जूनला मराठवाड्यात तीव्र शेतकरी आंदोलन*
*आ. रोहित पवार यांचा सरकारला इशारा*
मुंबई 23 :
विनाअट सरसकट शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी आ. रोहित पवार यांनी पंढरपूरच्या पवित्र भूमीत केलेल्या अन्नत्याग आंदोलनानंतर राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाची अद्याप पूर्तता न झाल्याने त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेत कर्जमाफीच्या प्रश्नावर विधानसभेत सविस्तर चर्चा घडवून आणण्याची मागणी केली आहे.
पंढरपूर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी आ. रोहित पवार यांची भेट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली होती. त्यावेळी अधिवेशनापूर्वी या विषयावर बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले; मात्र अद्यापही संबंधित बैठक आयोजित करण्यात आलेली नसल्याचे आ. रोहित पवार यांनी निदर्शनास आणून दिले.
यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिलेल्या निवेदनात आ. पवार यांनी कर्जमाफी योजनेतील जाचक अटी हटविण्याबाबत सभागृहात व्यापक चर्चा घडवून आणण्याची विनंती केली. तसेच शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार संबंधित विभागांचे मंत्री व वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय शिष्टमंडळाची तातडीने बैठक आयोजित करण्यासाठी शासनाला निर्देश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
या प्रस्तावित बैठकीसाठी आ. रोहित पवार यांच्यासह राजू शेट्टी, अजित नवले, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, अंबादास दानवे, सुधीर मुनगंटीवार, बच्चू कडू, जयंत पाटील (शेकाप), रघुनाथदादा पाटील, वामनराव चटप, रविकांत तुपकर, प्रवीणदादा गायकवाड, रविराज साबळे यांच्यासह विविध राजकीय पक्ष व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना सहभागी करून घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, विनाअट सरसकट शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास येत्या सोमवारी, २९ जून रोजी मराठवाड्यात शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा आ. रोहित पवार यांनी दिला असून सरकारने या इशाऱ्याची गांभीर्याने दखल घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
![]()
