*आमदार रोहित पवार यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत मॅरेथॉन बैठक

*आमदार रोहित पवार यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत मॅरेथॉन बैठक*

*कर्जत-जामखेड मतदारसंघातील प्रलंबित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा*

अहिल्यानगर, ता. १२ –

कर्जत-जामखेड मतदारसंघातील प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांसंदर्भात आमदार रोहित पवार यांनी अहिल्यानगरमध्ये जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्यासह सर्व विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत चार तास प्रदीर्घ बैठक घेतली. यावेळी रस्त्यांची संथगतीने सुरु असलेली कामे, निकृष्ट कामांची चौकशी, वीजपुरवठ्याबाबतच्या तक्रारी, शासकीय इमारतींची रद्द झालेली कामे, कर्जत-जामखेड शहरातील अस्वच्छता, पाणीपुरवठ्याच्या कामाच्या तक्रारी, वाढती गुन्हेगारी आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. तसेच प्रलंबित विषय तातडीने मार्गी लावण्याच्या आणि तक्रार असलेल्या कामांबाबत चौकशी करुन कारवाई करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.


यावेळी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्यासह इतर सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. तालुका स्तरावर सातत्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन जनहिताचे प्रश्न मार्गी लावण्याचा आमदार रोहित पार यांचा सातत्याने प्रयत्न असतो. परंतु काही विषय हे जिल्हा पातळीवरील असल्याने या प्रश्नांसंदर्भात त्यांनी बुधवारी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मॅरेथॉन बैठक घेतली. तब्बल ४ तास चाललेल्या या बैठकीची जोरदार चर्चा आहे.

कोणतेही कारण न देता मतदारसंघातील २३९ पाणंद रस्ते रद्द करण्यात आले आहेत तर रोजगार हमी योजनेतून कर्जत तालुक्यात १५२० आणि जामखेड तालुक्यात ९३० विहिरी मंजूर झाल्या असतानाही केवळ कामे सुरु न केल्याने त्या रद्द करण्यात आल्या. यावर आमदार रोहित पवार यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेअंतर्गत मतदारसंघातील ११६८ रस्त्यांचा प्रस्ताव पाठवला मात्र केवळ ३५ कि. मी. अंतरावरील रस्त्यांनाच मंजुरी देण्यात आली असून उर्वरित ११३३ रस्त्यांनाही निधी मंजूर करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शेतकऱ्यांना जमिन मोजणीच्या कामांना विलंब होत असल्याने ती तातडीने करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. सिद्धटेक येथील सभामंडपाच्या कामकाजात येणारे अतिक्रमण हटवणे, पोटखराबा जमीन लागवडीयोग्य नोंदणी करण्यास ३-३ वर्षे होणारा विलंब, पिक विमा योजनेतील शेतकऱ्यांच्या तक्रारी, रेशनकार्ड धारकांचे प्रश्न आणि इष्टांक वाढवून मिळणे, निमगाव गांगर्डा, पाटेगाव, चापडगाव, आंबी जळगाव आणि कुळधरण येथील तलाठी कार्यालयांना जागा उपलब्ध न झाल्याने ही कामे रद्द झाली, या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. औटेवाडी येथील ग्रामस्थांना शिल्लक प्लॉट उपलब्ध करून देण्याचा विषय, कुकडी डावा कालवा प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाचे प्रलंबित ४७ प्रस्ताव, खैरी प्रकल्पाच्या कालवाग्रस्त शेतकऱ्यांचा प्रलंबित मोबदला तातडीने देणे, कर्जत शहरातील अस्वच्छता, रमाई आवास योजनेतील घरकुलांचा प्रश्न, व्यापार संकुलातील गाळ्यांची सुरक्षा, भटके कुत्रे व मोकाट जनावरांचा होणारा त्रास, कर्जत शहरातील सीसीटीव्ही यंत्रणेचा विस्तार, कर्जत शहराचा पाणीपुरवठा, जामखेडमधील मलनिःस्सारण प्रकल्पाचे निकृष्ट बांधकाम आणि कामे न करता काढलेली बोगस बिले, कचरा डेपोमुळे जामखेडमधील आयटीआय मधील विद्यार्थ्यांना होणारा त्रास, शहरातील अस्वच्छता, जामखेड शहरातील व्यापारी संकुलासाठीचा वीजपुरवठा, लोकांना जन्म दाखल्यांसाठी ३-४ महिने करावी लागणारी प्रतीक्षा, मागील वर्षी अतिवृष्टीमुळे वाहून गेलेला खेड-शिंपोरा रस्त्यावरील नांदणी नदीवर नव्याने पुल उभारणे आणि तूर्तास आर्मी बेली ब्रीजची उभारणी या प्रत्येक विषयावर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली आणि कोणतेही कारण न देता हे विषय मार्गी लावण्याचा आग्रह यावेळी आमदार रोहित पवार यांनी धरला आणि तशा स्पष्ट सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या.


जामखेड शहरातील महामार्गाचे काम अतिशत संथ गतीने सुरु आहे. श्रीगोंदा-जामखेड रस्त्याला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. जलजीवन मिशन योजनेतील काही गावांमधील कामे ही निकृष्ट दर्जाची झाली आहेत. त्यामुळे कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यातील संथ गतीने सुरु असलेली रस्त्यांची सर्वच कामे वेगाने आणि दर्जेदार करण्याच्या आणि निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करुन कारवाई करण्याचा सूचना या बैठकीत अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कमी असलेल्या ७४ शिक्षकांची तातडीने नेमणूक करण्याची मागणीही आमदार रोहित पवार यांनी यावेळी केली.

यंदा पावसाला आधीच उशीर झाला असताना खते आणि बियाण्यांची साठेबाजी होऊन त्यांची चढ्या भावाने विक्री केली जाते. यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना आणखी अडचणींचा सामना करावा लागतो. या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन साठेबाजी आणि चढ्या भावाने खते आणि बियाण्यांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

जामखेड तालुक्यातील काही तलाठी कार्यालयांची कामे निकृष्ट झाली असून १४ तलाठी कार्यालये सुरु होऊन बंद झाले तर ९ तलाठी कार्यालये अद्याप सुरुही झालेले नाहीत. कृषीच्या फिडरवर असलेल्या काही वाड्या वस्त्यांना सायंकाळी ६ ते १० या वेळेत अजूनही वीज मिळत नाही. सिंगल फेज वीज पुरवठ्यासंदर्भातील अनेक कामे प्रलंबित असून ते तातडीने पूर्ण करण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या. जळालेली रोहित्रे तातडीने बदलून मिळत नाहीत आणि सोलार योजनेतही अनेक अडचणी आहेत. त्या सोडवण्याबाबतही या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

या बैठकीत कायदा व सुव्यवस्थेबाबतही सविस्तर चर्चा झाली. कर्जत-जामखेड मतदारसंघात अनेक अवैध धंदे सुरु असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाणही वाढत असल्याने निरपराध नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते, अशी चुकीची कामे पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना त्यांना पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. भरोसा सेलच्या माध्यमातून प्रभावी काम करता येते हे मागील काही काळात दिसून आले आहे. त्याअनुषंगाने हे काम अधिक चांगल्या प्रकारे करण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या. कर्जत आणि जामखेड या दोन्ही शहरात विद्यार्थी-विद्यार्थीनींना कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घेण्याच्यादृष्टीने पोलिसांची गस्त वाढवण्याच्या आणि बस स्थानकावर सीसीटीव्ही लावण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. शिवाय पोलिस विभागासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याची मागणीही यावेळी पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली.

कोट

‘‘माझ्या कर्जत-जामखेड मतदारसंघात तालुका पातळीवर सातत्याने अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन जनहिताचे निर्णय मार्गी लावण्याचा माझा सातत्याने प्रयत्न असतो, पण जे प्रश्न वरिष्ठ पातळीवर सोडवायचे असतात त्या विषयांसाठी जिल्हाधिकारी पंकज आशिया साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत अहिल्यानगर इथं बैठक झाली. या बैठकीला इतर सर्व विभागांचे प्रमुख अधिकारीही उपस्थित होते. या बैठकीत रस्ते, पाणीपुरवठा, पीक विमा, सार्वजनिक विकास कामे व वैयक्तिक लाभर्थ्यांचे विषय, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, वीज पुरवठ्याबाबची अडचण, खते आणि बियाण्यांचा काळाबाजार, सार्वजनिक हिताच्या कामांमध्ये न पाळली जाणारी गुणवत्ता आदी प्रत्येक विषयावर सविस्तर चर्चा झाली आणि हे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याबाबत सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. सर्वच अधिकारी हे चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत असून काम करताना त्यांना येणाऱ्या अडचणींवरही यावेळी चर्चा झाली. अपेक्षा आहे की, पुढील काही दिवसांत हे सर्व प्रश्न वेगाने मार्गी लागतील’’

– रोहित पवार (आमदार, कर्जत-जामखेड)

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles