कर्जत-जामखेडच्या दुष्काळसदृश परिस्थितीचा पालकमंत्री विखे पाटलांनी घेतला आढावा
चारा-पाणी टंचाईच्या नियोजनासाठी प्रशासनाला दिले स्पष्ट निर्देश
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गटविकास अधिकारी शुभम जाधव यांना पालकमंत्र्यांनी धरले धारेवर
जामखेड प्रतिनिधी –
टंचाईच्या परिस्थितीला सामोरे जाताना प्रशासकीय यंत्रणेने अतिशय संवेदनशीलपणे काम करावे. कोणताही नियम अथवा कायद्याची अडचण सांगून शेतकऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण करू नका. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून, जामखेड तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसंपदा विभागाने महत्त्वपूर्ण निर्णयांची कार्यवाही सुरू केली आहे. कुकडी धरण समूहातील पाण्याचा लाभ आवर्तनाच्या माध्यमातून जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना देण्याबाबत निश्चितपणे विचार केला जाईल, अशी ग्वाही जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.कर्जत-जामखेड तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, सारा व पाणीटंचाईबाबत आढावा व नियोजन बैठक जामखेड येथे विधान परिषद महाराष्ट्र राज्याचे सभापती ना. प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांनी जामखेड तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. तसेच आरणगाव येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेती पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला.चारा व पाण्याच्या नियोजनाला प्राधान्य दुष्काळी भागातील प्रश्न समजून घेण्यासाठी आयोजित बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. दुष्काळी भागाला न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलदगतीने निर्णय घेतले आहेत. पाण्याचे नियोजन करतानाच जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करणे ही प्रशासनाची प्राथमिकता असावी, असे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.तालुक्यात चारा उत्पादन वाढविण्यासाठी पशुसंवर्धन व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.पंचनाम्यांपासून कोणीही वंचित राहू नये.दुष्काळसदृश परिस्थिती गंभीर झाल्यास सर्व नुकसानीचे पंचनामे करावेत. मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही, असे स्पष्ट करत टँकरच्या नियोजनासाठी ग्रामसेवक व तलाठी यांनी उपस्थित राहणे सक्तीचे करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
परिस्थिती गंभीर असल्याने प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून काम करावे. बैठकीत चुकीची अथवा खोटी माहिती देऊ नये. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण होऊ देऊ नका. अन्यथा कारवाई करण्याची वेळ आणू नका, असा स्पष्ट इशाराही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.नुकसानग्रस्त प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी निधी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कवडगाव, चौंडी, जवळा येथील कोल्हापूर बंधाऱ्यांची कामे, मोहरी तलावाचा सांडवा तसेच कुकडी कालव्यांच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांच्या दुरुस्तीसाठी जलसंपदा विभागाने निधीची उपलब्धता करून दिली असल्याची माहिती पालकमंत्री विखे पाटील यांनी दिली.कृष्णा खोऱ्यातील अतिरिक्त पाणी जामखेडला मिळावे.विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी तालुक्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेत कृष्णा खोऱ्यातील अतिरिक्त पाणी जामखेड तालुक्याला मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. शासनाने दुष्काळसदृश परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक निर्णय घेतले असून, त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनातील अधिकाऱ्यांची आहे, असे त्यांनी सांगितले.
कोणाला खूश करण्यासाठी चुकीची माहिती देऊ नका. पीक विमा, वीज प्रश्न तसेच जलजीवन मिशनच्या योजनांबाबत प्रशासनाने अधिक गांभीर्याने काम करण्याची गरज असल्याचे प्रा. राम शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी आ. सुनील कर्जतकर यांनीही विविध सूचना मांडल्या.बैठकीस भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, नगराध्यक्षा सौ. प्रांजल चिंतामणी, अतिरिक्त जिल्हाधिकारी शैलेंद्र हिंगे, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, महावितरणचे रमेश पवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी दशरथ दिघे, प्रांताधिकारी नितीन पाटील, विनायक देशमुख, अंबादास पिसाळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
चौकट –
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गटविकास अधिकारी शुभम जाधव यांना पालकमंत्र्यांनी धरले धारेवर
जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शुभम जाधव यांच्याकडे विचारणा केली. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत विचारलेल्या काही प्रश्नांना गटविकास अधिकारी जाधव यांना समाधानकारक माहिती देता आली नाही.वाघा येथील शेतकरी बांधवांनीही यावेळी गटविकास अधिकाऱ्यांकडे विविध प्रश्न उपस्थित केले. मात्र, संबंधित प्रश्नांबाबतही ठोस माहिती देता आली नाही. पालकमंत्र्यांनी ग्रामसेवक व सर्कल यांच्या उपस्थितीबाबत विचारणा केली असता, संबंधित अधिकारी बैठकीसाठी उपस्थित नसल्याचे समोर आले. त्यामुळे वाघा येथील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना तत्काळ उत्तरे देता आली नाहीत.शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत प्रशासनाने अधिक संवेदनशीलता आणि तत्परता दाखवून प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती घेऊन कार्यवाही करावी, अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी दिल्या.
![]()



