दसरा निमित्त हजारो जामखेडकरांच्या उपस्थितीत रावण दहन कार्यक्रम संपन्न

दसरा निमित्त हजारो जामखेडकरांच्या उपस्थितीत रावण दहन कार्यक्रम संपन्न

श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने दुर्गामाता महादौडचा समारोप

जामखेड (प्रतिनिधी)-

श्री दुर्गामाता दौड ही २५ वर्षांची परंपरा कायम राखत यंदाही (२० ऑक्टोबर २०२६ रोजी) विजयादशमीला दुर्गामाता महादौड उत्साहात संपन्न झाली आणि रावण दहनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

गेल्या पंचवीस वर्षांपासून जामखेड शहरात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दुर्गामाता दौडीचे आयोजन केले जाते. घटस्थापनेपासून ते विजयादशमीपर्यंत नित्य दुर्गामाता दौड शेकडो शिवप्रेमींच्या उपस्थितीत पार पडली.

विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी महादौड मोठ्या उत्साहात पार पडली. दुर्गामाता मंदिर, बाजारतळ येथून महादौडीला सुरुवात झाली. शहरातील विविध ठिकाणी महादौडीचे पूजन करण्यात आले. यावेळी महापुरुषांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.

त्यानंतर खर्डा रोडवरील ग्रामदैवत श्री लोहार देवी मंदिर येथे महाआरती करण्यात आली. यावेळी शस्त्रपूजन करून लाठी-काठी, दानपट्टा यांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. शेवटी रावण दहन करण्यात आले.

याप्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जामखेड तालुका अध्यक्ष पांडुराजे भोसले यांनी आगामी पन्हाळगड ते विशाळगड मार्गे पावनखिंड या किल्ले मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

यावेळी असंख्य शिवभक्त व ग्रामस्थांनी खर्डा चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व्हावे, अशी मागणी पुन्हा एकदा मांडली. ही अनेक वर्षांपासूनची मागणी असून दोन्ही लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा, अशी भावना व्यक्त करण्यात आली. तसेच आई भवानीने दोन्ही लोकप्रतिनिधींना स्मारकासाठी सद्बुद्धी द्यावी, हीच विजयादशमीच्या पवित्र दिनी आई भवानी चरणी प्रार्थना करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी हजारोच्या संख्येने माता-भगिनी, शिवप्रेमी उपस्थित होते. या शिस्तबद्ध नियोजनाबद्दल जामखेडकरांनी आयोजकांचे कौतुक केले. ‘शिवरायांचे आठवावे रूप’ या प्रेरणा मंत्राने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles