अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पिक विमा व नुकसान भरपाई मिळावी – जिल्हा बँक संचालक श्री.अमोल राळेभात
जामखेड प्रतिनिधी,
जामखेड तालुक्यातील सर्व महसुली गावामध्ये अतिवृष्टी होवून अनेक घरांची पडझड झालेली आहे. नदी पात्राशेजारील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून वाहून गेलेल्या असून शेतकऱ्यांच्या शेतातील कांदा, सोयाबीन, उडीद, मुग, तूर, मका, कपाशी, ऊस या पिकाबरोबरच फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
सततचा पाऊस हि राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्यात यावी. ”सततच्या पावसामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीकरिता NDRF यांचे निकष बाजूला ठेवून अतिरिक्त/वाढीव दराने मदत देण्यात यावी.”बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण करून किमान ३३ % पेक्षा जास्त शेत पिकाचे नुकसान झाले असल्याने मदत देण्यात यावी. तसेच आपतीग्रस्त लोकांना जीवनावश्यक वस्तूची व वैदयकीय सुविधा तत्काळ पुरविण्यात याव्यात.
जामखेड तालुक्यात झालेली पूरपरिस्थिती अत्यंत भयानक असल्याने शासनाने अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीकरिता २४ तासामध्ये ६५ मिमी.पेक्षा जास्त पाऊस हा निकष कायम ठेवून सामान्यकृत वनस्पती निर्देशांक (NDVI) हा अतिरिक्त निकष शेती पिकाच्या नुकसानीकरिता तत्काळ लागू करून नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर दिवाळीपूर्वी जमा करावी तसेच खरीप हंगामातील सर्व पिकांचा पिक विमा मंजूर करताना ई-पिक पाहणी हा निकष शिथिल करून पिक विमा घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम देण्यात यावी.
अशी मागणी अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक श्री.अमोल जगन्नाथ राळेभात साहेब यांनी कर्जत-जामखेडचे लोकप्रिय आमदार मा.श्री. रोहित (दादा) पवार साहेब, जिल्हाधिकारी साहेब तसेच जामखेडचे तहसीलदार साहेब यांना केली आहे.