*भटक्या (घिसाडी)समाजातील लक्ष्मी सोळुंके हिला न्याय द्या* – ॲड डॉ अरुण जाधव
जामखेड प्रतिनिधी,
नागठाणा (बु.) ता.उमरी जि. नांदेड येथील रहिवाशी मयत लक्ष्मी राम सोळुंके या भटक्या (घिसाडी) समाजातील युवतीचा सामुहिक बलात्कार करून निघृणपणे हत्या करण्यात आली.या घटनेच्या निषेधार्थ आज दिनांक १ मार्च २०२५ रोजी जामखेड पोलीस स्टेशन येथे सकल भटके विमुक्त समाज व घिसाडी समाज, जामखेड तालुका यांच्या वतीने जामखेड पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांना निवेदन देण्यात आले.
याबाबत निवेदनात म्हटले आहे की,भटक्या जमातीच्या (घिसाडी) कु.लक्ष्मी राम सोळंके हिचा साहेबराव विठ्ठल गायकवाड या नराधमाने निर्दयीपणे खून केला आहे तसेच दहशतीचे वातावरण निर्माण करुन पुरावा नष्ट केल्या बाबत.
मयत कु.लक्ष्मी राम सोळंके रा.नागठाणा (बु.) वय 19 वर्ष, ता.उमरी जि. नांदेड येथील रहिवाशी होती. ती इयत्ता बारावीची परीक्षा देत होती. इंग्रजी विषयाचा पेपर तीने दि.11/02/2025 रोजी दिला होता तो यशवंत हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज उमरी येथे शिक्षण घेत होती. तीच्याच गावातील साहेबराव विठ्ठल गायकवाड हा गेल्या दीड वर्षांपासून मयत लक्ष्मी सोळंकेला शारिरिक, मानसिक व आर्थिक दृष्टया ब्लॅकमेल करुन त्रास देत होता. सदरील मयत लक्ष्मी सोळंकेचे कुटुंब घिसाडी काम करते, तीचे आई-वडिल अज्ञानी आहेत, तसेच तीची छोटी बहिण इ. 8 वीत शिकते व मोठी बहिण विवाहीत आहे, तीचा भाऊ मोलमजूरीसाठी हैद्राबाद येथे असतो.
मयत लक्ष्मी सोळंकेचे गावात फक्त एकच घर आहे, तिला पाठबळ नसल्याने वरील आरोपीने या गोष्टीचा गैरफायदा घेतला, मयत लक्ष्मीचे घर कच्चे आहे, गोपनीय पध्दतीने मयत लक्ष्मी सोळंकेचे आरोपीने अश्लील फोटो मोबाईल मध्ये घेतले आणि दीड वर्षापासून तीला ब्लॅकमेल करीत होता. या गोष्टी मयत लक्ष्मीच्या आईला दसरा सणाच्या वेळी समजल्या, मयत लक्ष्मीची आई राधाबाई राम सोळंके हिने उमरी येथे पोलीस स्टेशनमध्ये याविषयी माहिती दिली. मात्र आरोपीचे माकड चाळे बंद झाले नाहीत. आरोपीला त्याची आई सुमनबाई गायकवाड सहकार्य करीत होती. मयत लक्ष्मी प्रामाणिक, जिद्दी व कष्टाळू होती. तीला पोलीस विभागात नोकरी करायची होती. ती प्रसंगाला तोंड देण्यास सक्षम होती. ती आरोपीला दाद देत नव्हती. तसेच आई- वडिलांना याबाबत आपले दुःख सांगून काळजीत टाकत नव्हती. या गोष्टीची सल आरोपीच्या डोक्यात होती. आरोपी वारंवार मयत लक्ष्मीला ब्लॅकमेल करीत होता. दि.11/02/2025 रोजी मयत लक्ष्मीने इंग्रजी या विषयाचा पेपर दिला होता. त्या रात्री जेवण करुन दुसऱ्या पेपरचा अभ्यास छोटया बहिणीसोबत करीत होती. आई-वडिल व छोटी बहिण रात्री 12 वाजता झोपी गेले. त्यानंतर अंदाजे काही वेळाने मयत लक्ष्मी शौचालयासाठी अंगणात आली, शेजाराच्या छतावर आरोपी जाणीवपूर्वक झोपण्यासाठी इतर मित्रासोबत येत होता. तो मयत लक्ष्मीवर पाळत ठेवून होता त्यानेच मयत लक्ष्मीचा दोरीने गळा आवळून खून केला आहे.
रात्री दोन वाजता मयत लक्ष्मीची बहिणी उटून बाजूला पाहत होती तीला बहिण घरात दिसली नाही, बाहेर अंगणात आल्यावर मयत लक्ष्मी दिसली. तीला आरोपीने गळयाला साडी बांधली होती व साडीचे दुसरे टोक लिंबाच्या फाटयाला बांधले होते. मयत लक्ष्मी दोन्ही गुडग्यावर बसली होती. छोटी बहिणीने आराडा-ओरड केला आई-वडिल झोपेतून जागे झाले आईने गळयाची साडी सोडली मयत लक्ष्मीचे अंग गरम होते. श्वास चालू होता, पोट उडत होते, घरच्या लोकांनी मोठयाने आरडा-ओरड सुरु केली, शेजारचे नागरबाई आनंदा गायकवाड, सिद्राम गायकवाड, प्रकाश गायकवाड, शिवाजी पाटील पंचलिंगे (मा. सरपंच) दिगंबर गायकवाड (सरपंच), बाळू उपसरपंच, साईनाथ लिंगाडे (पो.पाटील), व प्रल्हाद बोडके गुरुजी घटनास्थळी आले. मयत लक्ष्मीची आई मोठयाने ओरडून म्हणत होती माझ्या मुलीला साहेबरावनेच दोरीने आवळून मारले आहे. मयत लक्ष्मीचे नातेवाईक दवाखान्यात नेण्यासाठी सर्वांना विनंती करीत होते, मात्र कोणीच प्रतिसाद दिला नाही मयत लक्ष्मी तासभर जिवंत होती, कोणताच वाहनवाला दवाखान्यात नेण्यासाठी तयार झाला नाही.
पोलीस पाटील व गावकऱ्यांनी कुठलेच सहकार्य केले नाही, तीचा जीव गेल्यानंतर आई-वडिल बेभान झाले. लगेच पोलीस पाटील, प्रल्हाद बोडके गुरुजी तीला अग्नी देण्याची तयारी करु लागले, मयत लक्ष्मीला PM साठी घेवून जावू नका अशी तंबी पोलीस पाटील देवू लागले, अन्यथा तुम्हीच गुन्हेगार ठरताल, तुमच्या अंगणात प्रकार झाला आहे. माझे ऐका नाहीतर जेलमध्ये सडून मरताल अशी धमकी देवून वातावरण दहशतीचे केले. मयत मुलीच्या भावाला हैद्राबाद येथे प्रल्हाद बोडके गुरुजीने फोन केला, तुझी बहिण फाशी घेवून मेली आहे, तु लवकर मातीला ये असे सांगितले. भावाने PM करा मी आलोच असे सांगितले, त्यावर बोडके गुरुजी म्हणाले तु पागल आहेस.घिसाडी समाजात अविवाहीत मुलींना दफन करता, अग्नी देत नाहीत असे सकाळी आलेले नातेवाईक गावकऱ्यांना सांगत होते, मात्र पोलीस पाटील, सरपंच, व बोडके गुरुजी नातेवाईकांना तुम्हाला अक्कल नाही असे म्हणत होते. अशा पध्दतीने आरोपीला सहकार्य करण्याचे काम पोलीस पाटील, सरपंच व प्रल्हाद बोडके गुरुजी करीत होते. त्यांनी कोणाचेच न ऐकता दडपशाही करुन मयत लक्ष्मीला अग्नी दिला.
या सर्व प्रकारामुळे मयत लक्ष्मीचे कुटुंब दहशतीमध्ये आले आहे. त्यांना गावातून स्थलांतर व्हावे लागले आहे, तरी या प्रकरणाची सीआयडी तपासणी करण्यात यावी, तसेच मोबाईल मधील सीडीआर उपलब्ध करुन घ्यावा, मयत लक्ष्मीच्या कुटुंबाला संरक्षण द्यावे, आरोपी साहेबराव विठ्ठल गायकवाड यांना फाशीची शिक्षा व्हावी या प्रकारामध्ये असणारे सहआरोपी आपण शोधून काढावे व पिडीत कुटुंबाला २० लाखाची आर्थिक मदत मिळावी तसेच कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावे व फास्ट ट्रक वर केस चालवावी व लक्ष्मी राम सोळंके या युवतीवर सामुहिक बलात्कार करून हत्या करण्यात आलेली असे समजते.पोलीस प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी करुन योग्य ती कारवाई करावी व पिढीत कुटुंबाला न्याय द्यावा. ही विनंती.
यावेळी भटक्यांचे नेते ॲड डॉ.अरुण जाधव, जेष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात, प्रदीप टापरे,मोहन पवार, नय्युमभाई सुभेदार,अमित जाधव,धनराज पवार,विकी घायतडक,आजिनाथ शिंदे, कैलास चव्हाण,सागर चव्हाण, विशाल पवार, नंदकुमार गाडे,जमीर सय्यद,सागर भोसले, अमोल लोहकरे, बाबुराव फुलमाळी,संतोष चव्हाण, तुकाराम पवार,शितल काळे,रामा पवार,विकास साळुंके,शुभम साळुंके,राजु शिंदे,शुभम साळुंके, ऋषिकेश गायकवाड आदी उपस्थित होते.