महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली जामखेडची ज्वारी 5000 पार
गरिबांची भाकरी महागली ,सामान्य नागरिक चिंतेत
जामखेड प्रतिनिधी,
सतत होत असलेली महागाई यामुळे सर्व सामान्य जनता खूपच होरपळून निघत आहे. मागील अनेक वर्षापासून गरिबांचा आहार मानली जाणारी ज्वारी उत्पादन घटल्याने महागली आहे. वाढत्या महागाईमुळे ज्वारीची भाकर गरिबांच्या ताटातून गायब होऊ लागली आहे. यंदा ज्वारीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. गेल्या वर्षी पावसाची अनियमितता असल्याने उतारा कमी बसल्याने उत्पादन घटले आहे.
स्थानिक बाजार समितीत सर्वसाधारण ज्वारीला 5000 हजार, प्रतिक्विंटल भाव आहे. जिल्ह्यात सर्वत्र ज्वारीचे उत्पादन कमी झाले आहे. काही वर्षांपूवी ज्वारी हे गरिबांचे धान्य समजले जात असे. गहू केवळ सणासुदीला ताटामध्ये दिसत. मात्र आता परिस्थिती बदलली आहे.
एकीकडे ज्वारीची भाकर पचनास हलकी असल्याने व आरोग्यासाठी अतिशय लाभदायक ठरणारी आता श्रीमंतीचे प्रतीक झाली आहे. गव्हापेक्षाही ज्वारीचे भाव वाढले आहेत तर दुसरीकडे गरिबांच्या ताटात भाकरी ऐवजी चपाती दिसू लागली आहे.
जिल्ह्यात वर्षानुवर्षे ज्वारीचे पीक घेणारे शेतकरी आता नावालाच ज्वारीची पेरणी करतात. त्यांचा कल आता नगदी पिकाकडे दिसत आहे. ज्वारी महागल्याने गरिबांना महागाईचे चटके जाणवू लागले आहेत. एकेकाळी १ हजार ५०० ते दोन हजार रुपयांमध्ये मिळणारी ज्वारी आता पाच हजार रुपये क्विंटलवर पोचली आहे. त्यामुळेच गरिबांच्या ताटातून आता ज्वारीची भाकर गायबच झालेली दिसत आहे.
गेल्या आठवडाभरात बाजार समितीत ज्वारीची आवक घटली आहे.त्यामुळे व्यापारी आणि सामान्य नागरिक चिंतेत आहे
वैरणीचाही तुटवडा
सध्या ज्वारीला चांगला दर मिळत असला तरी, नगदी पीक उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. पारंपरिक पद्धतीने पेरली जाणारी ज्वारी आता केवळ पीक व जनावरांना वैरण राहावे, या उद्देशाने पेरली जात आहे. वैरणीचाही तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. वैरणीचे दरही गगनाला भिडले आहेत. मात्र, दुसरीकडे स्थूलपणा कमी करण्यासाठी ज्वारी व बाजरीला मागणी वाढली आहे.