चौंडी – इंदौर बस नान्नज , जवळा , चापडगाव मार्गे अहिल्यानगर , इंदौर या मार्गे चालवण्याची मागणी.

चौंडी – इंदौर बस नान्नज , जवळा , चापडगाव मार्गे अहिल्यानगर , इंदौर या मार्गे चालवण्याची मागणी.

चौंडी ग्रामपंचायतीच्या वतीने निवेदन.

जामखेड प्रतिनिधी  –

जामखेड एसटी आगाराने नव्याने सूरू केलेली चौंडी – इंदौर बस जामखेड हून झिक्री , नान्नज , जवळा , हाळगाव , चौंडी , चापडगाव मार्गे अहिल्यानगर , इंदौर या मार्गे चालवण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. यामार्गे बस चालवणे प्रवाशांच्या दृष्टीने सोईस्कर होणार असल्याने प्रवाशांचा वेळ आणि पैसे वाचणार आहेत.

 

याबाबत चौंडी ग्रामपंचायतीच्या वतीने राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर, अहिल्यानगरचे विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप, जामखेडचे आगारप्रमुख प्रमोद जगताप यांना निवेदन दिले आहे. बुधवारी (ता.१८) चौंडीचे सरपंच अविनाश शिंदे व ग्रामविकास अधिकारी सुरेश पुरी यांनी जामखेड आगाराचे सहाय्यक वाहतूक निरिक्षक महादेव ढगे व नितीन दाणी यांना समक्ष भेटून निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की , जामखेडहून ही बस सकाळी लवकर चौंडीला निघाल्यानंतर अक्षरशा मोकळी असते.चौंडीतून इंदौर जाणारे प्रवाशी नसतात .मात्र जिल्ह्याच्या ठिकाणी अहिल्यानगर ला जाणारे असतात. अशा प्रवाशांना चौंडीलगत असलेल्या चापडगावमार्गे चारपदरी हायवेने केवळ एक तासात अहिल्यानगरला जाता येते. असे असताना चौंडीतील प्रवाशी जामखेड – आष्टी – कडा मार्गे अहिल्यानगरला जाणे का पसंत करतील ? असा प्रश्र विचारला जात आहे. कारण चौंडीहून जामखेड मार्गे अहिल्यानगरला जाण्यासाठी तब्बल तीन तास वेळ लागणार आहेत. त्याचबरोबर तिकीटासाठी पैसे जास्त लागणार आहेत.

जामखेडहून पहाटे पाच वाजता बस निघाल्यानंतर चौंडीपर्यंत प्रवाशी मिळत नाहीत. परत चौंडीहून जामखेड पर्यंत सकाळी सहा वाजता किती प्रवाशी मिळतात याबाबत साशंकता आहे.

 

चौंडी – इंदौर बस नियमीत चालण्यासाठी, या बसला प्रवाशी मिळण्यासाठी सदरची बस जामखेडहून चौंडीला नेताना जामखेड तालुक्यातील सर्वात मोठया नान्नज – जवळा मार्गे हाळगावहून चौंडी ला नेतानाच परत जामखेड मार्गे अहिल्यानगरला न नेता ही बस चौंडीहून पुढे चापडगावमार्गे अहिल्यानगरला नेल्यास प्रवाशांचे प्रवासासाठीचा दोन तास वेळ वाचेल आणि पैसे वाचतील. त्यातच या बसला प्रवाशांचा प्रतिसादही चांगला मिळेल. जामखेड हून चौंडीकडे जाताना ही बस नान्नज – जवळा मार्गे नेल्यास या मार्गावरील चुंबळी, सदरवाडी, पाडळी , झिक्री , धोंडपारगाव , राजेवाडी , नान्नज, बोर्ले , जवळा व हाळगाव या तालुक्यातील गावांतील प्रवाशांची सोय होणार आहे. या मार्गावरून थेट अहिल्यानगरला बस नसल्याने प्रवाशांना ही बस खूप सोईची बस होईल. या मार्गावरील प्रवाशांना अहिल्यानगरहून रात्री उशिरा आपल्या गावी येणे शक्य होणार आहे.

 

*चौंडीहून अहिल्यानगर जाण्यासाठी एक तासाऐवजी, लागतात तीन तास ! चौंडी – जामखेड मार्गे अहिल्यानगर अंतर १०५ किलोमीटर आहे. हे अंतर पार करण्यासाठी तब्बल तीन तास वेळ लागतो.चौंडी हून चापडगावमार्गे अहिल्यानगर हे अंतर ८५ किलोमीटर असून, हे अंतर अवघ्या एक तासात पार करता येते.

*जामखेड आगाराचा ढिसाळपणा..

चौंडी ते इंदौर बस सेवा सूरू करण्याची ही दुसरी वेळ आहे. मात्र या बसचा मार्ग ठरवताना कसलाही विचार न करता मार्ग ठरवणे. परिणामी या बसला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नाही आणि कालांतराने उत्पन्न नाही याकारणाने बस बंद होते.

*प्रतिक्रिया –

चौंडी ते इंदौर बस जामखेडहून नान्नज,जवळा, चौंडी ,चापडगाव मार्गे अहिल्यानगर अशी चालवावी अशी प्रवाशांची मागणी आहे. यामार्गावरील प्रवाशांची सोय होणार आहे.याबाबत परिवहनमंत्र्यांसह एसटीचे व्यवस्थापकीय संचालक, अहिल्यानगरचे विभाग नियंत्रक व जामखेडचे आगारप्रमुखांना निवेदन दिले आहे.

— अविनाश शिंदे

सरपंच , चौंडी

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page