घोडेगाव ग्रामपंचायतीतील गैरव्यवहाराविरोधात गवळी यांचे तहसील समोर उपोषण
घोडेगाव (ता. …) :
घोडेगाव ग्रामपंचायतीतील गैरव्यवहार, विकासकामांतील अडथळे व शाळांमधील शिक्षकांच्या कमतरतेविरोधात तहसील समोर प्रभू नवनाथ गवळी यांनी पुन्हा एकदा उपोषणास सुरुवात केली आहे.
गवळी यांनी आरोप केला की, सरपंच व ग्रामसेवक कोऱ्या प्रोसिडिंग बुकवर सदस्यांच्या सह्या घेऊन मनमानी ठराव करतात. याबाबत तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
जिल्हा परिषद शाळा व जिजामाता विद्यालयात अपुरे शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून पालकांच्या वारंवार तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे गवळी यांनी सांगितले. तसेच सरपंचांनी मागील तीन वर्षांपासून घेतलेले चुकीचे ठराव रद्द करावेत आणि बडेकर दलित वस्तीवरील मंजूर निधी तातडीने खर्च करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
पंचायत समितीत चौकशीसाठी गेले असता विस्तार अधिकाऱ्यांनी टिंगलटवाळीची भाषा वापरल्याचा आरोप गवळी यांनी केला. तर ग्रामसेवक नागरिकांशी अरेरावीने वागत असल्याचेही त्यांनी सांगितले.
“माझ्या जीवाला धोका असून, काही अनुचित घडल्यास त्याला सरपंच, ग्रामसेवक व संबंधित अधिकारी जबाबदार असतील,” असा इशारा गवळी यांनी दिला आहे.