जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यात कांदा उत्पादन मोठय़ा प्रमाणावर होत असून हा कांदा अहमदनगर, सोलापूर व कडा या ठिकाणी जातो. यामुळे शेतकऱ्यांना मोठा वाहतूक खर्च करावा लागतो. त्यामुळे सोलापूर अहमदनगर व कडा या ठिकाणी मिळणाऱ्या सुविधा सर्व सुविधा येथील व्यापाऱ्याना देऊन जामखेड बाजार समीतीत कांदा मार्केट सुरू करावे यासाठी जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले यांनी कडा बाजार समीतीला भेट देऊन सर्व माहिती घेतली.
जामखेड तालुक्यात इतर शेतीपीकांबरोबरचे कांद्याचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र जामखेड बाजार समितीत कांदा मार्केट नसल्याने शेतकऱ्यांना हा कांदा अहमदनगर, सोलापूर व कडा यासह राज्यातील इतर ठिकाणी घेऊन जावे लागत असल्याने शेतकऱ्यांना मोठा वाहतूक खर्च करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा अर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना अहमदनगर, सोलापूर, कडा आदि ठिकाणी मिळणारा बाजार भाव जामखेड बाजार समितीत देऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थिक उन्नतीसाठी त्यांना सहकार्य करता यावे. यासाठी या ठिकाणी कोणत्या उपाययोजना करता येतील यासाठी कडा बाजार समीतीला भेट देऊन आवश्यक ती माहिती घेतली असून त्यानुसार जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत त्या उपलब्ध करून देण्यात येणार.
यासाठी बाजार समिती आवारातील सर्व शेतकऱ्यांनी यास समंती दर्शवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सोलापूर, नगर व कडा येथे मिळणार भाव जामखेड येथेच मिळणार आहे.
अशी माहिती बाजार समितीचे सभापती पै शरद कार्ले यांनी दिली आहे. यावेळी त्यांच्या समवेत संचालक सचिन घुमरे हेही उपस्थित होते.