जांबवाडी जवळील मातकुळी रस्त्यालगत असलेल्या विहिरीत पडून चार जणांचा दुर्देवी मृत्यू…

जामखेड तालुक्यात भीषण अपघात,बोलेरो वाहन विहिरीतच

जामखेड प्रतिनिधी –

जामखेड नगरपरिषद हद्दीतील, जांबवाडी जवळील मातकुळी रस्त्यालगत असलेल्या विहिरीत आज बुधवार दि. १५ जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास चार तरूण चार चाकी बोलेरो गाडीने जामखेड कडे येत असताना जांबवाडी शिवारात रस्त्यालगत असलेल्या विहिरीजवळ चालकाचा ताबा सुटल्याने पन्नास फूट खोल विहिरीत बोलेरो गाडी पडली. मोठा आवाज आल्याने परिसरातील नागरिक विहिरीजवळ गोळा झाले.

त्यांना बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी चारही जणांना मृत घोषित केले.जामखेड येथील अशोक विठ्ठल शेळके वय 29 रा. जांबवाडी, रामहरी गंगाधर शेळके वय 35 रा. जांबवाडी, किशोर मोहन पवार वय 30 रा. जांबवाडी, चक्रपाणी सुनील बारस्कर वय वय 25 रा. राळेभात वस्ती असे चार तरूण मातकुळी कडून जांबवाडी मार्गी जामखेडकडे येत होते. जांबवाडी जवळ रस्त्यालगत असलेल्या विहिरीत पवनचक्की कंपनीची ची बोलेरो गाडी एम एच. 23 ए. यु. 8485 पडल्याने एकच मोठा आवाज झाला यामुळे जवळच रस्त्याचे खडीकरण काम सुरू असल्याने तेथील मजूर घटनास्थळी धावले, व चारही तरूणांना बाहेर काढले आणि ताबडतोब ग्रामीण रुग्णालयात दाखल केले पण तत्पुर्वीच चौघांचाही मृत्यू झाला होता.

अद्यापही बोलेरो गाडी विहिरीत आहे.चक्रपाणी सुनील बारस्कर हा पवनचक्की कंपनीच्या गाडीवर चालक होता. पवनचक्की कंपनीचे काम बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात काम सुरू आहे.ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाली होती. वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक शिंदे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.चार पैकी दोघांचे लग्न झाले होते. त्यांना लहान लहान मुले आहेत. तर दोघे अविवाहित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *