जामखेडमध्ये तरुणाचा हात तोडणाऱ्या हल्ल्यातील आणखी दोन आरोपींना अटक!
मागील भांडणाच्या रागातून कट रचल्याचा पोलिसांचा दावा; आष्टी तालुक्यातील चिंचपूर शिवारातून दोघांना घेतले ताब्यात
जामखेड प्रतिनिधी –
जामखेड शहरातील कान्होपात्रानगर येथील राहुल हिरामण अंधारे (वय ३४) या तरुणावर जीवघेणा हल्ला करून त्याचा हात तोडल्याच्या प्रकरणात जामखेड पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. गणेश प्रभाकर चव्हाण (वय ३०, रा. सावरगाव, ता. जामखेड) आणि वसीम मस्तफा शेख (वय ३३, रा. ढोरगल्ली, ता. आष्टी, जि. बीड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या कारवाईमुळे संबंधित गुन्ह्याच्या तपासाला वेग आला आहे.मागील भांडणाच्या रागातून हल्ला केल्याचा आरोप जामखेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.३५ वाजण्याच्या सुमारास राहुल हिरामण अंधारे याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्याचा हात गंभीररीत्या जखमी होऊन तो तोडण्यात आला होता. या घटनेनंतर जखमीचा रुग्णालयात जबाब नोंदवून जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७०२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०९(१), ३५२ आणि ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान साथीदारांची नावे उघड
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान २२ ऑक्टोबर रोजी पोलीस कोठडीत असलेल्या अटक आरोपींकडे गुन्हा करण्यामागील कारण आणि अन्य साथीदारांबाबत चौकशी करण्यात आली. त्यावेळी मागील भांडणाच्या रागातून साथीदारांच्या मदतीने कट रचून गुन्हा केल्याची माहिती आरोपींकडून मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. या तपासात गणेश प्रभाकर चव्हाण आणि वसीम मस्तफा शेख यांची नावे समोर आली.

चिंचपूर शिवारातून दोघांना अटक पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही संशयित आरोपी आष्टी तालुक्यातील चिंचपूर गावात असल्याचे समजले. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित मोरे आणि त्यांच्या पथकाने चिंचपूर येथे जाऊन शोधमोहीम राबवली. यावेळी दोन्ही संशयित चिंचपूर गावच्या शिवारात आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मक्का, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर आणि जामखेडचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित मोरे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर बेल्हेकर, गणेश साने, दत्तू बेलेकर आणि प्रकाश जाधव यांचा समावेश होता.या गुन्ह्याचा पुढील सखोल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित मोरे करीत आहेत.
![]()
