*कन्नुर विद्यापीठ केरळ येथील आंतरराष्ट्रीय काजवा परिसंवादात रणजित राऊत यांचा सक्रिय सहभाग*

*कन्नुर विद्यापीठ केरळ येथील आंतरराष्ट्रीय काजवा परिसंवादात रणजित राऊत यांचा सक्रिय सहभाग*

*राऊत यांनी केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व*

जामखेड प्रतिनिधी केरळ राज्यातील कन्नूर विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभाग, ख्रिस्त कॉलेज इरिंजलकुडा व फायरफ्लाईस एशियन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “आंतरराष्ट्रीय काजवा परिसंवाद – काजव्यांचे वर्गीकरण, विविधता आणि जैव-पर्यावरणशास्त्र: काजव्यांच्या जगाला प्रकाशमान करणे” हा तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवाद ३ ते ५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान उत्साहात संपन्न झाला. या परिसंवादात भारतासह अमेरिका, ऑस्ट्रेलिया, थायलंड, श्रीलंका, पाकिस्तान, बोलिव्हिया, व्हीएतनाम, मलेशिया आदी देशांतील तसेच भारतातील जम्मु काश्मीर, दिल्ली, तेलंगणा, आंध्रप्रदेश, ओडिसा, आसाम, हिमाचल प्रदेश,पश्चिम बंगाल, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र या राज्यातील नामांकित शास्त्रज्ञ, प्राध्यापक, संशोधक व अभ्यासक सहभागी झाले होते.
या महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय परिसंवादात महाराष्ट्रातुन अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथील युवा शास्त्रज्ञ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर संलग्नित योगेश्वरी महाविद्यालय अंबाजोगाई चे जैवविविधता संशोधक रणजित रावसाहेब राऊत यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. त्यांनी “काजव्यांच्या संवर्धन व संरक्षणाची गरज : आव्हाने व उपाय” या विषयावर अभ्यासपूर्ण सादरीकरण केले. आपल्या सादरीकरणातून त्यांनी काजव्यांचे पर्यावरणीय महत्त्व, त्यांच्या अधिवासावर होत असलेले मानवी हस्तक्षेपाचे परिणाम, प्रकाश प्रदूषण, रासायनिक कीटकनाशकांचा वाढता वापर तसेच काजव्यांच्या संख्येत होणारी घट याविषयी सविस्तर मांडणी केली.
रणजित राऊत यांनी काजव्यांच्या संवर्धनासाठी स्थानिक समुदायाचा सहभाग, जनजागृती मोहीम, पर्यावरणपूरक पर्यटन, जैवविविधता नोंदवही निर्मिती तसेच शास्त्रीय संशोधनावर आधारित धोरणे राबविण्याची आवश्यकता प्रतिपादित केली. त्यांच्या सादरीकरणानंतर विविध देशांतील तज्ज्ञ शास्त्रज्ञ व संशोधकांसोबत त्यांनी सखोल चर्चा करून अनुभवांची देवाणघेवाण केली. या चर्चेमध्ये काजव्यांच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर एकत्रित प्रयत्न करण्यावर विशेष भर देण्यात आला.
परिसंवादाचे उद्घाटन माजी कुलगुरू प्रा. एस. के. चक्रवर्ती यांच्या हस्ते झाले. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. लेस्ली बॅलनटाईन (ऑस्ट्रेलिया), प्रा. सारा लुईस (अमेरिका), डॉ. अण्णा वॉकर (यूएसए), डॉ. दम्मिका वेजिकून (श्रीलंका), डॉ. मोहम्मद शमसुद्दीन, डॉ. ए. के. चक्रवर्ती, डॉ. के. व्ही. प्रकाश, डॉ. व्हि. पी. उनियाल, डॉ. बिजोय, परवेझ खान यांसह अनेक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात काजवा संशोधन, जैवपरिस्थितिकी, वर्गीकरण, संवर्धन धोरणे तसेच नागरिक विज्ञान उपक्रम यावर विविध तांत्रिक सत्रे पार पडली.
युवा शास्त्रज्ञ रणजित राऊत यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागाबद्दल महाराष्ट्रातील शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या कार्यामुळे ग्रामीण भागातील जैवविविधता संशोधनाला नवी दिशा मिळत असल्याची भावना पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles