जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील संपूर्ण कासार समाज एकजुटीने एका ताकतीने तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथील कासार समाजातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अन्यायाबद्दल व घडलेल्या दुर्दैवी घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी व निवेदन देण्यासाठी तहसील कार्यालय जामखेड या ठिकाणी एकत्रित झाला होता.
मु.पो. निवघा तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथे राहणाऱ्या कासार समाजातील अल्पवयीन मुलगी वय वर्षे 17 हिचा गावातील गावगुंड ज्ञानेश्वर पवार उर्फ सोन्या यांने मागील वर्षभरात अनेक वेळा छेडछाड करून तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. तसेच वेळोवेळी लज्जा उत्पन्न होईल अशी वर्तणूक केली. अखेरीस या सर्व छळाला व त्रासाला कंटाळून दिनांक 12/07/2023 रोजी या मुलीने विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली.
या आत्महत्येस प्रवृत्त करणार्या गाव गुंडाला वेळोवेळी समज देऊनही तो कायम या अल्पवयीन मुलीची छेड काढत होता. त्याने या मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले म्हणून गावगुंड ज्ञानेश्वर पवार उर्फ सोन्या या आरोपीवर पोक्सो ( बाल लैंगिक अत्याचार ) अंतर्गत गुन्हा दाखल करावा व आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्रातील कासार समाजातर्फे करण्यात येत आहे. घडलेल्या या दुर्दैवी घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठीचे निवेदन माननीय तहसीलदार साहेब जामखेड यांना देण्यात आले.
यावेळी कासार समाजाचे जामखेड तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व कार्यकारिणी व कासार समाजातील सर्व समाज बांधव, महिला मुली, मुले बहुसंख्येने उपस्थित होते.