*जामखेड ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन*
जामखेड प्रतिनिधी –
भक्ती, श्रध्दा आणि परंपरेचा संगम असलेल्या जामखेड ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे यंदाही मोठ्या भक्तिभावाने आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिलीप चांदमलजी बाफना, आकाश दिलीप बाफना, बाफना परिवार तसेच विठ्ठल भजनी मंडळ यांच्या वतीने या भव्य-दिव्य आणि अपूर्व दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या दिंडीचा शुभारंभ रविवार, २६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी नऊ वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, जामखेड येथे होणार आहे. पारंपरिक टाळ-मृदंगाच्या गजरात, विठ्ठलनामाचा जयघोष करत वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत.श्रीक्षेत्र पंढरपूर कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आयोजित या दिंडी सोहळ्याची सांगता सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. या दिंडी परंपरेला गेल्या ३० वर्षांचा अखंड वारसा लाभला असून, बाफना परिवाराने वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी सातत्याने योगदान दिले आहे.

यावेळी आकाश बाफना म्हणाले की,गेल्या तीन दशकांपासून आमचा बाफना परिवार या पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करीत आहे. वारकरी परंपरेचा हा अमूल्य वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे, ही आमचीच जबाबदारी आहे. विठ्ठलनामाचा जयघोष करत, भक्तिभावाने चालणारी ही दिंडी म्हणजे भक्ती, सेवा आणि समाज एकतेचे प्रतीक आहे.

सर्वांनी या सोहळ्यात सहभागी व्हावेत.यात्रेत दरवर्षी शेकडो वारकरी, भाविक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी होतात. वाटेत विविध ठिकाणी भजन, कीर्तन, हरिनाम सप्ताह आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते. भक्तीभाव, सामाजिक ऐक्य आणि विठ्ठलनामाचा गजर यांनी दरवर्षी ही दिंडी जामखेडच्या धार्मिक वातावरणात नवचैतन्य निर्माण करते.
![]()