*महाराष्ट्र दिनी आ.रोहित पवार यांनी लॉन्च केलेलं रॅप साँग उतरले तरुणाईच्या पसंतीस*
कर्जत / जामखेड | महाराष्ट्रातील युवक-युवतींना एकत्रित आणून राज्याच्या भविष्याच्या धोरण निर्मितीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्र व्हिजन फोरम ही एक प्रभावी युवा चळवळ सुरू केली आहे. युवांना त्यांच्या राज्याच्या विकासाबद्दल असलेल्या अपेक्षा या माध्यमातून सरकारपर्यंत पोचवता येत आहेत. राज्यातील विविध शहरांमध्ये महाविद्यालयात जाऊन आमदार रोहित पवार हे तरुणाईशी संवाद साधत आहेत आणि त्यांच्या प्रश्नांना अगदी मनमोकळी उत्तरे देखील देत आहेत. आतापर्यंत ५ लाखांहून अधिक युवांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकारणी आणी युवा रॅपर्स यांच्यामध्ये जरा वेगळेच असे समीकरण आपल्याला पाहायला मिळाले आहे. अशातच रॅपच्या माध्यमातून तरुणाईला महाराष्ट्र व्हिजन फोरम या युवा केंद्रित सामाजिक उपक्रमाबद्दल सांगण्यात आले आहे. अनेक वेळा रॅप म्हटलं की शिव्या, अर्वाच्य भाषा असे दिसते. परंतु या महाराष्ट्र व्हिजन फोरमच्या रॅपमध्ये अतिशय उत्तम पद्धतीने शब्द मांडणी करून उपक्रमाचा उद्देश आणि एकंदर संपूर्ण संकल्पना अतिशय उत्तम प्रकारे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. उत्तम संगीत आणि शब्दांच्या बांधणीमुळे सध्या तरुण वर्गात या रॅपचा बोलबाला दिसून येत आहे.
तरुणाईच्या सध्याच्या काळातील ट्रेण्ड लक्षात घेऊन आमदार रोहित पवार यांनी नुकताच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र विजन फोरम युवा केंद्रित सामाजिक उपक्रमाचे रॅप सॉंग लॉन्च केले आणि अल्पावधीतच ते व्हॉट्सॲप व इतरही समाज माध्यमांवरून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. शुभम जाधव अर्थात रॅाकसन या उभरत्या रॅपरने हे गाणे गायलेले आहे.