बाळगव्हाण फाट्यावर वीज पोल उभारताना हाय व्होल्टेजचा शॉक लागून कामगाराचा मृत्यू…
जामखेड प्रतिनिधी –
जामखेड तालुक्यातील खर्डा शहराजवळील बाळगव्हाण फाट्यावर विजेचे पोल रोवण्याच्या कामादरम्यान हाय व्होल्टेज लाईनला संपर्क आल्याने एका कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना आज दि. १० ऑगस्ट रोजी दुपारी घडली.
लोणी फाटा येथील मिळालेल्या माहितीनुसार, शाळेच्या आवारात पोल उभारण्याचे काम खाजगी ठेकेदाराकडून सुरू असताना ही दुर्घटना घडली. देवदैठन येथील गणेश भोरे हा तरुण पोल बसवताना एल टी लाईनवर अचानक मुख्य लाईनशी संपर्कात आला आणि त्यात जागीच प्राण गमावला. खाजगी ठेकेदाराने कोणतीही अधिकृत परवानगी किंवा मंजुरी न घेता हे काम सुरु केल्याचा आरोप केला असून, महावितरणच्या व खाजगी ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे स्थानिक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचे म्हणणे आहे.या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून, संतप्त ग्रामस्थांनी दोषींवर तत्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे.
यावेळी आनंदवाडीचे सरपंच गीते, आनंदवाडी ग्रामपंचायत सदस्य भरत होडशिळ,लोणी ग्रामपंचायत सदस्य अन्सार नवाब पठाण तसेच आंदवाडी व लोणी मधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.