आमदार प्रा राम शिंदेंनी भरला बुथ प्रमुखांसह पन्नास प्रमुखांमध्ये जोश, जामखेड तालुक्यातील बुथप्रमुख मेळाव्यांना तुफान प्रतिसाद !

जामखेड : कर्जत जामखेड मतदारसंघातून आमदार प्रा.राम शिंदे यांना भाजपने रविवारी उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी जाहीर होताच आमदार प्रा.राम शिंदे यांनी सोमवारी खर्डा, जवळा जिल्हा परिषद गट व जामखेड शहरातील पन्ना प्रमुख, बुथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख व पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत जोश भरला. भर पावसात पार पडलेल्या या बैठकांना तुफान प्रतिसाद मिळाला.निवडणूकीला कसे सामोरे जायचे, काय रणनिती असणार यावर सखोल मंथन झाले. भूमिपुत्रांच्या हक्काची आणि स्वाभिमानाची लढाई ताकदीने लढायची आणि विक्रमी मताधिक्याने निवडणूक जिंकायची, असा निर्धार यावेळी करण्यात आला.

रविवार आमदार प्रा राम शिंदे यांना भाजपने कर्जत-जामखेड मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली. सलग चौथ्यांदा आमदार शिंदे यांना भाजपने विधानसभेच्या आखाड्यात उतरवले आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांच्या उपस्थितीत राजेवाडी, लोणी फाटा आणि जामखेड शहर या ठिकाणी बुथप्रमुख व पदाधिकाऱ्यांचे मेळावे पार पडले. आमदार शिंदे यांना तिकीट जाहीर झाल्याबद्दल महायुती व भाजपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आले.भर पावसात या मेळाव्यांना तुफान प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यातून बुथप्रमुखांसह पन्ना प्रमुखांमध्ये आमदार शिंदे यांनी चांगलाच जोश भरला गेला. मोठ्या उत्साहात या बैठका पार पडल्या. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना कर्जत-जामखेड प्रभारी – भरतभाई गोंदालिया म्हणाले की,आमदार प्रा राम शिंदे यांनी सेवादार म्हणून मतदारसंघात काम केले. जनतेचा सेवेकरी म्हणून काम केले. त्यामुळे पक्षाने त्यांना सलग चौथ्यांदा उमेदवारी बहाल केली. कर्जत-जामखेडमध्ये होणारी निवडणूक सामान्य नाही, मागील पाच वर्षात मतदारसंघातील कार्यकर्त्यांना मोठा संघर्ष करावा लागला.परंतू यंदा विरोधकाला असे हरवा की, यापुढेही कोणत्याही बाहेरच्या उमेदवाराला तुमच्या मतदारसंघात येऊन निवडणूक लढवण्याची तलफ झाली नाही पाहिजे. त्यासाठी मोठ्या ताकदीने कामाला लागा, जोश आणि बुध्दीने ही निवडणूक लढवा, कर्जत जामखेडच्या स्वाभिमानासाठी आणि आपल्या मातीतल्या भूमिपुत्राला जिंकून आणण्यासाठी जोमाने कामाला लागा, असे अवाहन त्यांनी केले.

यावेळी आमदार प्रा राम शिंदे म्हणाले की, मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत माझ्या पराभवानंतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेते यांनी गेल्या पाच वर्षांच्या कालखंडामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्ष उभा केला. प्रत्येक कार्यकर्ता ना कार्यकर्ता झुंजला, कार्यकर्त्यांना प्रचंड अडचणी आल्या, संकट आले पण तो हटला नाही, त्याने निकराची झुंज दिली. जनतेची सेवा केली. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, सहकारी संस्थांच्या निवडणूकीत घवघवीत यश मिळवले आणि पक्षाचे मजबुत संघटन उभा करण्याचे काम केले, त्याला प्रतिसाद देत पक्षाने मला पुन्हा एकदा तिकीट दिलं, त्याबद्दल पक्षाचे मनापासून आभार.

प्रत्येक बुथप्रमुख हा स्वता:च विधानसभेचा उमेदवार आहे असे समजून त्याने काम करावे, जमिनीवर राहून आपल्याला ही लढाई लढायची आहे. हवेत राहून काम केल्यास आपल्या सर्वांचाच कार्यक्रम होईल.आपले बुथ मजबुत ठेवण्यासाठी अहोरात्र काम करा.पुढील 30 दिवस पक्षासाठी द्या, पुढचे पाच वर्षे पक्ष तुमची योग्य दखल घेईल. विरोधकांनी मागच्या पाच वर्षांत नुसत्या भूलथापा दिल्या. आताही ते गंडवा गंडवी करतील. त्यामुळे सर्वांनी सतर्क रहावे, विरोधकांच्या चुकीच्या प्रचाराचा भांडाफोड करावा, आपल्या माध्यमांतून आजवर झालेली विकास कामे, केंद्र व राज्य सरकारच्या योजना घराघरात पोहचवा, सोशल मिडीयाचा सकारात्मक वापर करा, विरोधकांच्या जाळ्यात न अडकता आपले काम करत रहा,असे अवाहन आमदार प्रा राम शिंदे यांनी यावेळी केले.

दरम्यान, आज आणि उद्या कर्जत तालुक्यात माहिजळगाव, मिरजगाव, कर्जत शहर, कुळधरण, राशिन या पाच ठिकाणी बुथप्रमुख व पदाधिकाऱ्यांचे मेळावे पार पडणार आहेत. या सर्व मेळाव्यांना मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन, महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *