माझ्या कुटुंबातील आपल्या लाडक्या रामभाऊला मोठ्या मताधिक्याने विजयी करा – केंद्रीय मंत्री महाराज ज्योतिरादित्य शिंदे
आवाज जामखेडचा वृत्तसेवा :
ग्वाल्हेरचे महाराजा महादजी शिंदे व इंदोरच्या महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं बहिण भावाचं नातं होतं. आमदार प्रा. राम शिंदे हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कुटूंबातील वंशज आहेत. माता अहिल्यादेवींचं रक्त रामभाऊच्या नसानसांत आहे. आज मी जगदंबा मातेच्या पवित्र भूमीमध्ये माझ्या परिवारातील सदस्य असलेल्या राम शिंदे यांच्या प्रचारासाठी आलो आहे. माझ्या कुटूंबातील आपल्या लाडक्या रामभाऊला मोठ्या मताधिक्याने विजयी करा आणि विधानसभेत पाठवा, असे अवाहन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी राशीन येथे बोलताना केले.
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार प्रा राम शिंदे यांच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात गुरुवारी करण्यात आला. श्री क्षेत्र राशीन येथे महायुतीचे उमेदवार आमदार प्रा राम शिंदे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री तथा महाराज ज्योतिरादित्य शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या रॅली व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित विराट सभेला संबोधित करताना ज्योतिरादित्य शिंदे बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, विरोधकांना सांगा महाराष्ट्राची मशाल महादजी शिंदे आणि माता अहिल्यादेवींच्या वंशाजांच्या हातात आहे. ही निवडणूक नसून एक युध्द आहे, हे धर्मयुद्ध आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा सिध्दांत, त्यांची मुल्य, त्यांच्या विचारधाराचे युध्द आहे. भ्रष्टाचाऱ्यांची पार्टी संपवण्याचे हे युध्द आहे. महाराष्ट्राच्या मान सन्मान आणि अभिमानाचे हे युध्द आहे. मराठा ध्वजाची विरोधक चर्चा करतात, परंतु त्यांना जाती पातीचे राजकारण करून महाराष्ट्राचे विभाजन करण्याचा त्यांचा कुटील डाव आहे, त्यांचा हा डाव आपण सर्वजण मिळून उधळून लावू, असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीविरोधात जोरदार हल्ला चढवला.
महाविकास आघाडी नव्हे तर आपला सामना महाविनाश आघाडीशी आहे. हे लोक सत्तेवर आल्यास महाराष्ट्र आणि देशाचं विनाश करतील, त्यांना मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, हरियाणा निवडणूकीत धडा शिकवला आता नंबर महाराष्ट्राचा आहे. महायुतीला भरभरून साथ द्या, राज्यात डबल इंजिनचे सरकार निवडून आणा, असे अवाहन ज्योतिरादित्य शिंदे यांनी केले.
स्वातंत्र्य लढ्याची सुरूवात महाराष्ट्रातूनच झाली होती, ती राजनैतिक स्वातंत्र्याची लढाई होती, पण आता आर्थिक स्वातंत्र्याच्या लढाईची सुरूवात महाराष्ट्रातून होणार आहे.यंदाची विधानसभेची निवडणूक ही सामान्य निवडणूक नसून हिंदवी स्वराज्याच्या लढाईची सुरूवात या निवडणुकीतून होणार आहे. त्यासाठी सर्वांनी सज्ज रहावे, विरोधकांचे मनसुबे धुळीस मिळवून आमदार प्रा.राम शिंदे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणा असे अवाहन ज्योतिरादित्य शिंदे यांनी केले.
महायुती सरकार म्हणजे प्रगती आणि विकास, सरकारने महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी लाडकी बहिण योजना आणली. पुन्हा सरकार आल्यास १५०० चे २१०० रूपये थेट खात्यात जमा होतील. आमदार राम शिंदे यांनी कर्जत तालुक्यातील तरूणांच्या हाती रोजगार उपलब्ध व्हावा याकरिता कोंभळी खांडवी भागात एमआयडीसी मंजुर करून आणली आहे. राशीन शहर व परिसराच्या विकासासाठी कोट्यावधींचा निधी मंजुर करून अनेक महत्वाची विकास कामे त्यांनी मार्गी लावली. तसेच मतदारसंघाच्या सर्वांगिण आणि शाश्वत विकासासाठी मोठ्या प्रमाणात मतदारसंघासाठी निधी खेचून आणला. अनेक विकास कामे मार्गी लावले. जनहितासाठी सदैव तत्पर असलेल्या आपल्या लाडक्या रामभाऊला मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे अवाहन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केले.
एकिकडे डबल इंजिनची सरकार तर दुसरीकडे रिव्हर्स गियरची सरकार आहे आता निर्णय तुमच्या हातात, विकास आणि प्रगतीसाठी महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे विसरू नका आणि माझ्या कुटुंबातील सदस्य असलेल्या आमदार प्रा.राम शिंदे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे अवाहन यावेळी ज्योतिरादित्य शिंदे यांनी केले.
राशीन येथे शिंदे राजघराण्याची कचेरी आहे. नवरात्रोत्सवात या कचेरीपासून जगदंबा देवीची पालखी दरवर्षी निघते. या कचेरीचा लवकरच जिर्णोद्धार केला जाईल. लवकरच मी पुन्हा राशीनला येऊन माता जगदंबचे आशिर्वाद घेणार असा शब्द महाराज ज्योतिरादित्य शिंदे यांनी यावेळी बोलताना दिला.