आमदार प्रा राम शिंदे व जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात यांची द्विपक्षीय बैठक संपन्न !
रत्नापुरमध्ये उभय नेत्यांमध्ये बंद दाराआड दोन तास चर्चा !
जामखेड प्रतिनिधी :
आमदार रोहित पवारांच्या हुकुमशाही कारभाराला कंटाळून जामखेड तालुक्याचे जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात यांनी मागील आठवड्यात राष्ट्रवादीला रामराम ठोकला होता. राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर राळेभात हे पुढील राजकीय भूमिका कधी जाहीर करणार याकडे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे लक्ष लागलेले असतानाच आज २ रोजी प्रा मधुकर (आबा) राळेभात व आमदार प्रा.राम शिंदे या दोन्ही उभय नेत्यांमध्ये द्विपक्षीय बैठक पार पडली. सुमारे दोन तास बंद दाराआड दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. शिंदे व राळेभात यांच्यात पार पडलेल्या या द्विपक्षीय बैठकीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात यांनी गेल्या आठवड्यात रोहित पवारांच्या हुकुमशाहीविरोधात बंड पुकारत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला रामराम ठोकला होता. त्यानंतर प्रा मधुकर राळेभात हे कोणत्या पक्षात जाणार? याचीच उत्सुकता शिगेला पोहचलेली होती. २७ ऑगस्ट रोजी आमदार प्रा.राम शिंदे यांनी जामखेड तालुक्याचे जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात यांनी कर्जत जामखेडच्या विकासासाठी आणि स्वाभिमानासाठी भाजपात यावे, त्यांचा योग्य तो मान सन्मान राखला जाईल, अशी उघड भूमिका घेतली होती. याबाबत प्रा शिंदे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहीत प्रा राळेभात यांना भाजपा प्रवेशाचे खुले निमंत्रण दिले होते.
आमदार प्रा राम शिंदे यांनी प्रा मधुकर राळेभात यांना भाजपात येण्याचे खुले निमंत्रण दिल्यानंतर प्रा मधुकर राळेभात हे काय भूमिका घेणार ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.अखेर आठ दिवसानंतर प्रा राळेभात यांनी आमदार शिंदे यांच्या निमंत्रणाचा स्विकार केला. आज २ सप्टेंबर रोजी आमदार प्रा राम शिंदे व जेष्ठ नेते प्रा मधुकर राळेभात या दोन्ही उभय नेत्यांची पहिली द्विपक्षीय बैठक पार पडली. ही बैठक रत्नापुरचे माजी सरपंच दादासाहेब (बापु) वारे यांच्या निवासस्थानी पार पडली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 2 तास बंद दाराआड चर्चा झाली.
या बैठकीनंतर बोलताना आमदार प्रा राम शिंदे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर मी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून खुलं निमंत्रण दिले होते की तुम्ही भारतीय जनता पार्टी यावं आम्ही तुमचं स्वागत करतो, माझ्या निमंत्रणाला प्रतिसाद देत प्रा मधुकर (आबा) राळेभात यांनी माझ्या निमंत्रणाचा स्विकार केला. त्यानंतर आमची बैठक रत्नापुर येथे माजी सरपंच दादासाहेब वारे यांच्या निवासस्थानी पार पडली. कर्जत जामखेडचा विकास करायचा असेल तर जेष्ठ अनुभवी नेते सुध्दा आपल्या सोबत असायला हवेत अशी माझी भावना आहे. या बैठकीत अनेक मुद्द्यांवरती आमची चर्चा झाली पण ही चर्चा अजून पूर्णत्वाकडे गेलेली नाही. आगामी काही दिवसांत ही चर्चा पूर्णत्वाकडे जाईल अशी मला खात्री आहे, असे ते म्हणाले.
शिंदे पुढे म्हणाले की, जामखेड तालुक्याचे जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात हे भारतीय जनता पार्टीमध्ये आले तर मी त्याचं स्वागत करायला इच्छूक आहे. त्यांना जो पश्चाताप राष्ट्रवादी काँग्रेस आणि विद्यमान आमदाराच्या संदर्भात झाला तो पश्चाताप भारतीय जनता पार्टीमध्ये होणार नाही, अश्या पध्दतीची मी राळेभात यांच्याशी चर्चा केली आता त्यांनी निर्णय घ्यायचा आहे, असे यावेळी शिंदे यांनी स्पष्ट केले.
यावेळी बैठकीनंतर बोलताना जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात म्हणाले की, आमदार प्रा शिंदे साहेबांनी मला भाजपात या असे निमंत्रण दिले होते, त्यानुसार त्यांच्या निमंत्रणावरून आज आमची रत्नापुर येथे बैठक पार पडली. पुढच्या इलेक्शनला कसं सामोरं जायचं, काय करायचं ? अश्या बर्याचश्या गोष्टींवर या बैठकीत चर्चा झाली. गेल्या पाच वर्षापुर्वी मी राष्ट्रवादीचे काम करत होतो. गेल्या दहा वर्षापुर्वी मी स्वता: आमदार राम शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवलेली आहे. आम्ही दोघे ऐकमेकांचे विरोधक होतो. विरोधक असतानाही त्यांनी मला भाजपात येण्याचे निमंत्रण दिले. त्यानुसार आजची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक गोष्टींवर चर्चा झाली.
मी पक्ष सोडताना निर्णय घेतला होता की मी आता यापुढे पुन्हा रोहित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीचं काम करणार नाही, मी त्यावेळेसचं सांगितलं होतं की मी मला तिकीट मागत आहे. मला जर तिकीट मिळाले तर उमेदवारी करणार, तिकीट नाही मिळाले तर मी रोहित पवार यांच्या विरोधातील उमेदवाराला मदत करणार. आजही मी त्या मतावर ठाम आहे. आजच्या बैठकीत आमची विविध विषयांवर चर्चा झाली. पण कसं एकत्र यायचं हे निश्चित झालं नाही. एक दोन वेळेस चर्चा करून आणि कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार ते निश्चित होईल, त्यानंतर पुढील निर्णय घेऊ असे यावेळी प्रा मधुकर राळेभात म्हणाले.
यावेळी जामखेड बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, संचालक डाॅ गणेश जगताप, चेअरमन अशोक महारनवर, सुहास वारे, नगरसेवक अमित जाधव, नगरसेवक मोहन पवार, खर्ड्याचे ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे सह आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.